रघुवंशी कॉम्प्लेक्सला आग
By admin | Published: December 29, 2014 01:07 AM2014-12-29T01:07:09+5:302014-12-29T01:07:09+5:30
येथील आझाद बाग परिसरातील रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या वाहनतळामध्ये रविवारी दुपारी ११ वाजताच्या दरम्यान आग लागली.
चंद्रपूर : येथील आझाद बाग परिसरातील रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या वाहनतळामध्ये रविवारी दुपारी ११ वाजताच्या दरम्यान आग लागली. चंद्रपूर महानगर पालिका, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आग नेमकी कशाने लागली हे कळू शकले नाही.
शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बागेच्या अगदी जवळ रघुवंशी कॉम्प्लेस आहे. या कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठाण, बँक, विविध कंपन्यांचे शो रुम, हॉटेल, शैक्षणिक संस्था, खासगी कोचिंग क्लाससुद्धा आहे. हे सर्व असले तरी आग नियंत्रणासाठी कुठलीही व्यवस्था येथे नसल्याचे आज दिसून आहे. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कॉम्प्लेक्सच्या वाहनतळातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत होता. मात्र आग कशाला लागली हे समजू शकले नाही. कॉम्प्लेक्समध्ये दुकांनांची संख्या बघता किमान अग्निशनम यंत्रणा आणि वाहनतळाची व्यवस्था असणे गरजेचे असतानाही येथे सर्व नियम धाब्यावर बसविले आहे. वाहनतळामध्ये जाण्यायेण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. चंद्रपूर महानगरपालिकेच्या दोन अग्निशमन गाड्यांच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यानंतर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील अग्निशमन दल पोहचले. बल्लारपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सर्वांनी प्रयत्न करून आग विझविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विशेष म्हणजे, ज्या वेळी आग लागली त्यावेळी कॉम्प्लेक्सच्या पार्किं गमध्ये चार चाकी वाहन तसेच चार ते पाच दुचाकी होत्या. तिथेज एक मोठे जनरेटरसुद्धा होते. याला आगीने वेढले असते तर मोठी दुर्घटना घडली असली. विशेष म्हणजे, बांधकामापासून ही इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली. मात्र अद्यापही मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या असतानाही या इमारतींमध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षा व्यवस्था नाही. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली तर दुर्घटनांवर काही प्रमाणात आळा घालता येऊ शकतो. (नगर प्रतिनिधी)