रेल्वे मंत्र्यांना जिल्ह्यात आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 06:00 AM2020-03-17T06:00:00+5:302020-03-17T06:00:02+5:30
रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूरची ओळख मिनी भारत अशी आहे. २२ राज्यातले लोक या शहरात वास्तव्यास आहे. सर्व दिशांना येथून रेल्वे जातात. त्यामुळे येथील रेल्वे स्टेशन तसेच चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशन अत्याधुनिक व सुंदर व्हावे, यासाठी मी वनमंत्री असताना वनविभागाच्या माध्यमातून निधी देवून ही रेल्वे स्थानके सर्वोत्तम व देखणी व्हावी, यासाठी प्रयत्न केला. रेल्वे विभागाच्या स्पर्धेत ही दोन्ही रेल्वे स्थानके देशातील सर्वोत्तम व प्रथम क्रमांकाची रेल्वे स्थानके ठरली. या पुढील काळातही या रेल्वे स्थानकांवर आणखी सोयी उपलब्ध होतील. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकावर दोन फुड स्टॉल्सचे उदघाटन रविवारी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी स्टेशन प्रबंधक रामलाल, भाजपा नेते अजय दुबे, के.के. सेन, श्रीनिवास घोटकर, स्टॉल ओनर प्रकाश भानारकर, प्रविण कलसाईट, सुर्यनारायण राव, सुभाष पेकडे, रामलाल सिंह, भारती सोमकुंवर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, रेल्वेशी संबंधित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करेन. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना याठिकाणी आमंत्रित करून येथील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.