पाऊस बेपत्ता; दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:22 PM2018-06-18T23:22:55+5:302018-06-18T23:23:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे कडक तापलेली जमीन ओलीचिंब झाली. हा पाऊस दोन ते तीन दिवस सतत सुरू होता. पावसाने थोडी उसंत घेताच आनंदीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. अनेकांनी कापूस, सोयाबीन पेरणी तर धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून अचानक पाऊस बेपत्ता असल्याने पेरणी केलेले बियाणे अंकुरण्यापूर्वीच करपण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आता आकाशाकडे खिळल्या आहेत.
जिल्ह्यात खरिप हंगामात कापूस, धान, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने पेरणीची लगबग सुरू केली. जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस झाला. मात्र अचानक पाऊस गायब झाल्याने कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या पेरण्या वाया जातात की काय, अशी भिती आता निर्माण झाली आहे. हवामान खात्यानुसार जुनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकणार होते. मात्र पावसाने दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली असून आता मात्र पाऊसच बेपत्ता झाल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
चिमूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
चिमूर : तालुक्यात ७ जूनला झालेल्या पावसाने तालुक्यातील खडसंगी, आमडी, बोथली, रेगाबोडी, भिवंकुड आदी गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकाची लागवड केली. काही प्रमाणात कापूस व सोयाबीनची बियाणे उगवली. मात्र पावसाची दडी व कडक उन्ह तापत असल्याने उगवलेली रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक-दोन दिवसांत पाऊस न पडल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ या शेतकऱ्यांवर येणार आहे.
शेतकऱ्यांची निराशाच
तोहोगाव : चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी यावर्षीही शेतकऱ्यांची निराशाच होणार असल्याचे संकेत पावसाच्या दडीवरून दिसून येत आहेत. पहिल्याच दमदार पावसाने अनेकांनी पेरणी केली. मात्र आता बियाणे करपून जाण्याची भिती आहे. गतवर्षी बोंडअळी व मावातुडतुडा रोगाने शेतकºयांना बेजार केले. यावर्षी पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होणार आहे.
पेरणीचा खर्च वाया जाणार
आयुधनिर्माणी : पहिल्याच पावसाने अनेक शेतकरी आनंदीत होत बियाण्यांची पेरणी केली. मात्र आता पावसाने दडी मारली असून दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे उसणवारीवर किंवा कर्ज काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
बल्लारपूर तालुक्यात ७० टक्के पेरणी
बल्लारपूर : पावसाचा अंदाज न घेता पहिल्याच पावसाने आनंदित होवून बल्लारपूर तालुक्यातील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. मात्र आठवडाभरापासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २३ जूनपर्यंत पाऊस पडणार नसल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले असून अनेकांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
बियाणे करपण्याच्या मार्गावर
घोसरी : मृग नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने महागडी बियाण्यांची पेरणी केली. परंतु, पावसाच्या दडीने व तप्त उन्हामुळे बियाणे अंकुरण्याआधीच जमिनीतच करपण्याच्या मार्गावर आहेत. मृगाच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात तलाव, बोड्यांमध्ये पाणी साचले. मात्र आता पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बियाणे करपू नये यासाठी आईल इंजिनद्वारे पाणी देत आहेत.