पाचव्या दिवशीही पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:47 PM2019-07-03T22:47:57+5:302019-07-03T22:48:11+5:30
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज बुधवारीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजता चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सतत पाऊस हजेरी लावत असल्याने मामा तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज बुधवारीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजता चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सतत पाऊस हजेरी लावत असल्याने मामा तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे.
यंदा पावसाचे आगमन चांगलेच उशिराने झाले. खरीप हंगामाची तयारी पूर्ण करून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर २७ जूनला खºया अर्थाने जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस बरसला. मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाने दडी मारली नाही. मागील पाच दिवसांपासून तर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या सुमारासही दररोज पाऊस येत आहे. मागील पाच दिवसात चार-पाच तासांचा अपवाद वगळला तर सूर्य दिसला नाही. सातत्याने ढगाळ वातावरण कायम राहत आहे.
दरम्यान, आज बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपुरात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली.
साधारणता एक-दीड तास दमदार पाऊस झाला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बहुतांश भागात आज दमदार पावसाने हजेरी लावली. ऐन दुपारी पाऊस झाल्यामुळे फुटपाथवरील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. मात्र जिल्ह्यातील शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला.
सास्ती : राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या जैतापूर, भोयगाव, पेल्लोरा, नांदगाव, एकोडी, किन्होबोडी, भरोसा परिसरात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जैतापूर येथील मुरलीधर थेरे यांच्या शेतातील विहीर जोरदार झालेल्या पावसामुळे खचून गेली.