आगमनातच पावसाचे बहिर्गमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:45 AM2018-06-15T00:45:04+5:302018-06-15T00:45:04+5:30

खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पाऊस आलाही. मात्र आगमनात पावसाने अचानक बहिर्गमन केले आहे.

Rain in front of arrival | आगमनातच पावसाचे बहिर्गमन

आगमनातच पावसाचे बहिर्गमन

Next
ठळक मुद्देबळीराजाची आभाळाकडे नजर : पाऊस बेपत्ता झालाय हो....

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. त्याला पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात येईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पाऊस आलाही. मात्र आगमनात पावसाने अचानक बहिर्गमन केले आहे. आता पाऊस अनेक दिवस तोंड दाखविणार नाही, असे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. पाराही पुन्हा ४० अंशापार जाऊ लागला आहे.
हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. कृषी विभागाच्या सर्व्हेक्षण व आकडेवारीनुसार यंदा चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकाची लागवड केली जाणार आहे. यात सर्वाधिक एक लाख ९७ हजार हेक्टरवर कापसाचा पेरा असणार आहे. जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागही यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा कमी करून कापसाला प्राधान्य दिले. अल्पपावसामुळे भात पिकाला मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली आदी धान पट्टयातील अनेक भागात सिंचनाची सुविधाच नसल्यामुळे व निसर्गाच्या जलचक्राने दगा दिल्याने भात पिकांचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला होता. अशातच कापसाचे पीक जोमात असताना बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकºयावर अरिष्ट ओढवले होते. शेतकऱ्यांना कधी सुलतानी, तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. तरीही वर्षभराच्या भाकरीची तरतूद म्हणून शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीला लागल्याशिवाय गत्यंतर नाही. जीव एकवटून तो मशागत करतो.
परंतु खर्च अधिक व उत्पन्न कमी या चक्रव्यूहातून आजघडीला तरी बळीराजाची सुटका नाही. ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा डोलारा कृषी व्यवसायावरच अवलंबून आहे. पण निष्ठूर शासन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात भात, तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, मूग आदी पिके घेतात. यामध्ये भात व कापसाचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. अन्य कडधान्य पिकाचे क्षेत्र जेमतेम आहे. कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठीचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. नियोजनही तयार केले आहे. यात जिल्ह्यात एकूण चार लाख ७९ हजार ५०० हेक्टरवर खरिप पिकांची लागवड केली जाणार आहे. मागील वर्षी कृषी विभागाने आखलेल्या पेरणी क्षेत्रात घट झाली होती. यावेळी पुन्हा कृषी विभागाने पेरणी क्षेत्र वाढविले आहे. शेती व्यवसाय सध्या शेतकऱ्यांना परवडणारा राहिलेला नाही. मात्र शेतीशिवाय पर्याय नसल्याने बळीराजा जीव एकवटून शेतीच्या मशागतीला लागला आहे. नागरणी, वखरणी, शेतात शेणखत टाकणे, कुंपण तयार करणे, अनावश्यक झुडुपे हटविणे आदी कामे झाली आहेत.
आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बरसणार, अशी खूशखबर हवामान खात्याने दिली होती. त्यामुळे शेतकरी खूश होता. अंदाजाप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला. मात्र तो मान्सून नव्हता. त्यामुळे आगमनानंतर एक-दोन दिवसातच तो गायब झाला आहे. आता पुन्हा कडाक्याचे ऊन्ह तापू लागले आहे.
पारा पुन्हा ४० अंशावर
पाऊस अचानक गायब झाला आहे. हवामान खाते, नासा यांचे अंदाज कुठे गेले काही कळायला मार्ग नाही. मागील तीन दिवसात पाऊस आला नाही. उलट उष्णतामानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गुरुवारी चंद्रपुरात ४० अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. आणखी तापमानात वाढ झाल्यास उन्हाळ्याचे दिवस परत येतील, अशी भीती चंद्रपूरकरांना लागली आहे. अनेक गावात पाणी टंचाईदेखील निर्माण होईल.
आणखी काही दिवस पावसाची विश्रांती ?
१२ जूनपासून २२ जूनपर्यंत पाऊस गायब असेल, अशा आशयाचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती खुंटणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम भागात चक्रीवादळे निर्माण झाल्यामुळे ढग तिकडे ओढले जात असल्याचे या मॅसेजमध्ये नमूद आहे. हा मॅसेज खरा की खोटा हे हवामान खाते ठरविलच. मात्र सध्या या मॅसेजमुळे शेतकऱ्यांच्या मनातील धडधड वाढली आहे.
अनेकांनी केली पेरणी
जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी थोडाफार मान्सूनपूर्व पाऊस बरसताच पेरणी करून टाकली आहे. ज्यांची बागायची शेती आहे, ते सिंचनाद्वारे आपली पेरणी वाचवू शकतील. मात्र कोरडवाहू शेतात पेरणी झाली असेल तर ती व्यर्थ जाणार असल्याची शक्यता आहे.

Web Title: Rain in front of arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस