पावसाचा इंडिकेटर, बहावा फुलला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:55+5:302021-05-03T04:22:55+5:30
फोटो नागभीड : पावसाचा ‘इंडिकेटर’ म्हणून ज्या वृक्षाची ओळख आहे, त्या बहावा वृक्षास यावर्षी चांगला बहर आला आहे. ...
फोटो
नागभीड : पावसाचा ‘इंडिकेटर’ म्हणून ज्या वृक्षाची ओळख आहे, त्या बहावा वृक्षास यावर्षी चांगला बहर आला आहे. यावरून यावर्षी पाऊस वेळेवर व दमदार होईल, असे बोलले जात आहे.
सध्या वैज्ञानिक युगामध्ये पाऊस कधी आणि कसा होणार हे सांगणाऱ्या यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रगत झाल्या असल्या तरी ग्रामीण भागातील शेतकरी अनेक गोष्टींवरून पाऊस लवकर येणार की उशिरा येणार, याचा अंदाज आजही बांधत असतात. त्यात बहाव्याच्या फुलण्याचाही समावेश आहे.
पावसाच्या आगमनाची असाच चाहूल देणारा बहावा मोठ्या प्रमाणावर बहरला आहे. अतिशय आकर्षक अशी पिवळ्या धमक रंगाची फुले या बहाव्याला आली असून, बहरलेले हे बहाव्याचे वृक्ष लक्ष वेधून घेत आहेत. बहाव्याला बहर येण्याचा मार्च ते मे हा काळ आहे. यावर्षी हा बहावा वेळेवर फुलोऱ्यावर आल्याने यंदा वेळेवर पाऊस पडण्याचे संकेत बहावा वनस्पतीने दिले आहेत.
नागभीड तालुका वनसंपत्तीने समृद्ध आहे. तालुक्याच्या जंगलात अनेक वनस्पती आहेत. यात बहाव्याचाही समावेश आहे. घोडाझरी जंगल परिसरात तर या वनस्पतींची भरमार आहे. रविवारी नागभीड-ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बहावा ही वनस्पती अनेक ठिकाणी बहरून आली असल्याचे निदर्शनास आले. आयुर्वेदात बहावा या वनस्पतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहाव्याच्या शेंगांमध्ये औषधीगुण असल्यामुळे या शेंगांचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. खेड्यापाड्यात आजही काही आजारांवर बहाव्याच्या शेंगांचा उपयोग करण्यात येतो.