‘रेन वॉटर हार्वेस्टिग’चा मनपाला विसर
By admin | Published: July 7, 2016 12:47 AM2016-07-07T00:47:11+5:302016-07-07T00:47:11+5:30
उन्हाळा लागला की चंद्रपुरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. येथील तप्त उन्हाळ्यामुळे दरवर्षीच ही समस्या उद्भवते. यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी ....
उन्हाळ्यात पुन्हा पेटणार पाणी
रवी जवळे चंद्रपूर
उन्हाळा लागला की चंद्रपुरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. येथील तप्त उन्हाळ्यामुळे दरवर्षीच ही समस्या उद्भवते. यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी यंदा चंद्रपूरकरांना त्यांच्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसविण्यास बाध्य करण्याचा निर्णय घेतला. मनपाच्या या निर्णयाचे विविध सामाजिक संघटनांनीही स्वागत केले. मात्र आता मनपालाच या निर्णयाचा विसर पडला आहे. पावसाळा सुरू आहे तरीही कुठेही ही कामे सुरू असल्याचे दिसत नाही.
चंद्रपूर जिल्ह्याचा उन्हाळा राज्यभर प्रसिध्द आहे; नव्हेतर कुप्रसिध्द आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तर सुर्य अक्षरश: आग ओकत असतो. तप्त उन्हामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प एप्रिल महिन्यातच अखेरची घटका मोजयला लागतात. दोन-चार प्रकल्प ड्राय झालेले असतात. नदी-नाल्यांमध्येही पाणी नसते. असा अनुभव जिल्हावासीयांना दरवर्षीच येतो. या सर्व प्रकारामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावते. हातपंप, विहिरी आटून अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होते. काही ठिकाणी तर ही पाणी टंचाई एवढी भिषण असते की नागरिकांना अनेक अंतर पायपीट करून पाणी आणावे लागते.
दरम्यान, चंद्रपुरात पाणी टंचाई जाणवू नये, पावसाळ्याचे पाणी जमिनीत मुरुन उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली जाऊ नये, यासाठी महानगरपालिकेने यंदा कंबर कसली होती. पावसाळ्यातील पाणी उगाच व्यर्थ जाऊ नये म्हणून चंद्रपुरात घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला.
चंद्रपुरात असलेल्या १७५०० मालमत्ताधारकांची यादी मनपाने तयार केली. या मालमत्ताधारकांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्यास बाध्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच जे नवीन बांधकाम आहे, त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली नसेल तर बांधकाम परवानगी रद्द करण्याचेही ठरविण्यात आले.
तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या काळात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागाची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी काही नगरसेवक व मनपाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर संपूर्ण कामाचे चॉकआऊट करण्यात आले. मालमत्ताधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली नसेल तर त्यांना नोटीस बजावण्यात येणार होती.
विशेष म्हणजे, ज्या मालमत्ताधारकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली, त्यांना करामध्ये दोन टक्के सुट देण्यात येणार होती. या कामासाठी सहा कंत्राटदारही नियुक्त करण्यात आले. पावसाळ्याला जुलै महिन्यात सुरुवात होईल म्हणून २० जूनपूर्वीच ही कामे पूर्ण करायची, असे ठरविण्यात आले होते. मात्र आयुक्तांच्या बदलीनंतर ही प्रक्रियाच मंदावली.
चंद्रपुरात अपवादात्मक काही मालमत्ताधारक सोडले तर इतरत्र कुठेही ही सिस्टीम बसविल्याचे दिसून येत नाही. आता तर पावसाळा सुरू आहे. जुलै महिना पावसाचा महत्त्वाचा महिना समजाला जातो. तरीही मनपाला रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याच्या आपल्याच योजनेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पावसाळ्यातील पाणीही जमिनीत न मुरता व्यर्थ जाणार, हे निश्चित.
अनेक नगरसेवकांच्या घरीच ही सिस्टीम नाही
चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ नगरसेवक व पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरातील मालमत्तांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची व्यापक जनजागृती करणे आवश्यक होते. यासाठी मनपातील नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आधी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी, त्यानंतर नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे ठरविण्यात आले. मात्र काही नगरसेवकांचा व पदाधिकाऱ्यांचा अपवाद सोडला तर बहुतांश नगरसेवकांनी मनपाच्या या निर्णयाला बगल दिल्याचे दिसून येते.
चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ नगरसेवक व पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरातील मालमत्तांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची व्यापक जनजागृती करणे आवश्यक होते. यासाठी मनपातील नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी आधी आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवावी, त्यानंतर नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे ठरविण्यात आले. मात्र काही नगरसेवकांचा व पदाधिकाऱ्यांचा अपवाद सोडला तर बहुतांश नगरसेवकांनी मनपाच्या या निर्णयाला बगल दिल्याचे दिसून येते.