पावसाचे पाणी असेच गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:39 PM2018-09-10T22:39:56+5:302018-09-10T22:40:30+5:30

शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टिम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला.

The rain water was like this | पावसाचे पाणी असेच गेले वाहून

पावसाचे पाणी असेच गेले वाहून

googlenewsNext
ठळक मुद्देरेनवॉटर हॉर्वेस्टिंग सिस्टिमचा अभाव : आपल्या निर्णयाचा मनपालाच विसर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर हद्दीतील जमिनीची पाण्याची पातळी वाढावी, उन्हाळ्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू नये, यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविण्याचा निर्णय मनपाने घेतला. ही सिस्टिम नसेल तर इमारत बांधकामाला परवानगीच दिली जाणार नाही, असाही धोरणात्मक पवित्रा मनपाने घेतला. मात्र त्यानंतर मनपाला आपल्या धोरणाचा विसर पडल्याचे दिसते. काही इमारतींचा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी ही सिस्टिम बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाही पावसाचे पाणी जमिनीत न मुरता असे वाहून गेले.
चंद्रपूर शहराला हॉट सिटी म्हणून संबोधले जाते. येथील उन्हाळा राज्यात प्रसिध्द आहे. उन्हाळ्यात ४९ अंश सेल्सीयसपर्यंत चंद्रपूरचे तापमान पोहचते. विशेष म्हणजे, सगळीकडे उन्हाळा चार महिन्यांचा असला तरी चंद्रपुरात तो सहा महिन्यांचा असतो, असे आजवरचा अनुभव आहे. तीव्र उष्णतामानामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाते. त्यामुळे जलस्रोत आटून अनेक भागात भीषण पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे पावसाळ्यातील पावसाचे पाणी जमिनीत मुरणे अत्यंत आवश्यक आहे. ही गरज बघता घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसणे गरजेचे आहे.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेने शहर हद्दीतील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात मनपाने एक परिपत्रक काढून जनतेला आवाहनही केले. विशेष म्हणजे, शहरात कोणत्याही नव्या इमारतीचे बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक केले. ही सिस्टीम नसली तर बांधकामाला मनपाकडून परवानगी देण्यात येणार नाही, असाही धोरणात्मक निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करताना मनपाने गंभीरता दाखविली नाही. परिणामी बोटावर मोजण्याइतक्या इमारतींमध्येही ही सिस्टीम बसविल्याचे दिसून येते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्याचे पाणीही जमिनीत न मुरता नाल्यांवाटे वाहून गेले आहे.
नद्यांचे पात्रही झपाट्याने आटते
चंद्रपूर शहराला लागून इरई व झरपट या दोन नद्या आहेत. यातील झरपट नदीचे तर केव्हाच वाटोळे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस सोडले तर या नदी पात्रात तुरळक पाणी असते. इरई नदीत बऱ्यापैकी पाणी असते. मात्र उन्हाळ्यात या नदीचे पात्रही तळ गाठते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील पाण्याची पातळी आणखी जलदगतीने खाली जाते.
करात मिळणार होती सूट
चंद्रपूर मनपा हद्दीत असलेल्या ज्या इमारतधारकांनी आपल्या इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम बसविली असेल, त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देण्याचाही निर्णय तेव्हा मनपाने घेतला होता. असे केल्याने मालमत्ताधारक स्वयंस्फूर्तीने ही सिस्टीम बसवतील, असे मनपाला वाटले. मात्र तसे झाले नाही. मनपाने याबाबत अधिक तगादा लावला नाही. त्यामुळे बहुतांश इमारतधारक या सिस्टिमच्या भानगडीत पडले नाही.
जनजागृतीचा अभाव
शहरातील इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग बसविणे हा महत्त्वाकांक्षी निर्णय होता. यात लोकसहभाग मिळविण्यासाठी मनपाकडून व्यापक जनजागृती व सततचा पाठपुरावा अपेक्षित होता. मात्र मनपा प्रशासन असे करण्यात अपयशी ठरले. खुद्द मनपा प्रशासनच याबाबत गंभीर नसल्याने चंद्रपूरकरांनीही ही बाब गंभीरतेने घेतली नाही.

Web Title: The rain water was like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.