पावसाने शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:34 AM2021-09-04T04:34:02+5:302021-09-04T04:34:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र मागील पंधरवड्यापासून एक दिवसाआड पाणी सुरु आहे. हा पाणी धान पिकांसाठी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूर जिल्हा हा कृषी प्रधान आहे. या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धान, कापूस, सोयाबीनचेे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यात सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे वरच्या पाण्यावरच शेतकऱ्यांना शेती करावी लागते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. कडक ऊन तापत असल्याने पीक कोमेजायला लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र मंगळवारी व बुधवारी पावसाने जिल्ह्याभरात चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तसेच नागरिकांना उकाड्यापासून मुक्तता मिळाली आहे. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे आजाराचे प्रमाणही वाढले आहे.
निंदनासाठी मजूर मिळेना
चंद्रपूर : वेळी-अवेळी पाणी आल्याने धान पिकांत मोठ्या प्रमाणात कचरा तयार झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निंदन सुरु झाले आहे. मात्र निंदनासाठी मजूर भेटणे कठीण झाले आहे.
शेतात उभारा पक्षी थांबे
चंद्रपूर : सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, चक्री भुंगेरे आदी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावर अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी शेतात विविध ठिकाणी टी आकाराचे पक्षी थांबे उभारावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.