पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By admin | Published: September 21, 2015 01:12 AM2015-09-21T01:12:13+5:302015-09-21T01:12:13+5:30

नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले.

Rainwater harvesters turn grass | पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

Next

नगदी पिके अस्मानी संकटात : शेतकऱ्यांना मदतीची आस
नांदाफाटा : नुकत्याच झालेल्या पावसाने कोरपना व जिवती तालुक्यातील कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. यातच कवठाळा, पिंपळगाव, नांदा, बाखर्डी, भोयगाव, वनसडी, कोरपना आदी भागातील मिरचीचे पीक संकटात आले आहे. हवा व पाण्यामुळे फळाला आलेली झाडे कोलमडून पडली असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हरावला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.
अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसासह मिरचीची लागवड केली. कापूस पिकाच्या तुलनेत मिरचीचा उत्पादन खर्च अधिक आहे. या महिन्यात पीक फळावर आले असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसाने पिकाची हानी झाली. मिरची व इतर नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, औषधी व मजूर लावून निंदणही उरकवून टाकले. पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चापैकी अंदाजे ७५ टक्के खर्च यावर्षी शेतकऱ्यांनी आतापर्यंत केला आहे. कापसाची वेचणी एका महिन्यानंतर करायची तयारी शेतकऱ्यांनी केली तर मिरचीच्या उत्पादनासाठीही मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. याचबरोबर काही शेतकऱ्यांनी यावर्षी नव्याने ठिंबक सिंचनाचाही खर्च केलेला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, औषधे आदींची उधारी देणे बाकी असताना पिकांची ही अवस्था झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
याचबरोबर सोयाबीन, उडीद, मूग, तूर याही नगदी पिकांना काही भागात मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. (वार्ताहर)

उसगावातील कपाशीवर लाल्या अज्ञात रोगाचा प्रादूर्भाव
शेतकरी हवालदिल
घुग्घूस नजीकच्या उसगाव पंचक्रोशीतील कापसाच्या झाडावर लाल्या नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव व त्याबरोबरच अज्ञात रोगाचे आक्रमण झाले आहे. अडीच ते तीन हजार एकर जमिनीवर कपाशीचे झाडे करपत असल्याने उत्पन्नात घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या शंभर एकरवरील पीक नदीच्या पाण्यात बुडाले आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत.
अगोदरच नापिकी त्यात वेळेवर पाऊस नाही, शेतात जंगली जनावरांचा धुमाकूळ याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या कपाशीच्या झाडांची जोमाने वाढ होत असून फुले, बोंड लागले आहे. मात्र त्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी अधिकारी भोये यांच्या मार्गदर्शनानुसार हजारो रुपये खर्च करून औषधांची फवारणी केली. त्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून कपाशीची झाडे पिवळी पडत असून त्याची फुले गळू लागली आहेत. याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक संकटांनी अगोदरच बेजार असलेला शेतकरी अधिक चिंतातूर झाला आहे. नुकताच वर्धा नदीच्या काठावरील शेतीतील उसगाव, वढा, पांढरकवडा या शेत शिवारातील सुमारे शंभरपेक्षा अधिक एकर जमिनीवरील पिके पाण्याखाली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
कृषी विभागाने सदरच्या अज्ञात रोगाचा शोध घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दरम्यान, चंद्रपूर पंचायत समितीचे सभापती नामदेव ठाकरे, सरपंच निवेता ठाकरे, उपसरपंच माया जुमनाके, धनंजय ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुटकर आदींनी या गावातील शेतांना भेटी देऊन पाहणी केली.

Web Title: Rainwater harvesters turn grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.