शासकीय इमारतीत साठवणार पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 03:04 PM2019-07-17T15:04:21+5:302019-07-17T15:04:54+5:30
नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय इमारतीत यापुढे पावसाचे पाणी साठवले जाणार आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत पावसाचे पाणी साठवणाची (रेन वॉटर हार्वेस्टींग) अंदाजपत्रकातच तरतूद करावी. तसेच जुन्या इमारतीत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
वाढती लोकसंख्या, झपाटयाने होणारे शहरीकरण, वेगाने कमी होत जाणारे जंगलाचे क्षेत्र, शहरासह ग्रामीण भागातही वाढत चालले प्रदूषण या सर्वांचा परिणाम पाणी साठयावरही होऊ लागला आहे. पाणी उपलब्धतेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामुळे पावसाचे उपलब्ध होणारे पाणी अधिक काळजीपूर्वक साठवले, तर त्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. यामुळे पाण्याची बचत आणि संवर्धन होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रेन वॉटर हार्वेस्टींगचा वापर बांधकामात वाढत चालला आहे.
राज्य शासनानेही आपल्या सर्वच शासकीय इमारती हरित इमारत संकल्पनेद्वारे उभ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच आता नव्याने बांधण्यात येणाºया इमारतीत ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे नव्याने बांधण्यात येणाºया इमारतीच्या अंदाजपत्रकात रेन तसेच रूफ वॉटर हार्वेस्टींगची आवश्यक तरतूद प्राधान्याने करण्याचे आदेश दिले आहेत.
इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी शास्त्रीय पद्धतीने संकलित करून ते उपलब्ध जागेत जमिनीवर अथवा जमिनीखाली टाकी बांधून साठवून ठेवावे, साठवलेल्या पाण्याची आवश्यकतेप्रमाणे प्रक्रिया करून हे पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य सर्व उपयोगासाठी आणण्यासाठी नियोजन करावे, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
ज्या शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते, अशा अस्तित्वातील इमारतींच्या बाबतीत प्राधान्याने रेन वॉटर हार्वेस्टींगची कामे देखभाल दुरुस्ती अंतर्गत असलेल्या निधीतून अथवा जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करून पूर्ण करून घ्यावीत, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात चांगली संधी
चंद्रपूर हा पाणीदार जिल्हा आहे. पावसाचे प्रमाणही चांगले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टींग केले तर मोठया प्रमाणात पाणी साठवणूक होऊ शकते. या पाण्याचा वापर बगिचे विकसित करण्यासह स्वच्छतागृहांसाठी होऊ शकतो. अशा अनेक कार्यालयांत या निर्णयाचा मोठा फायदा होऊ शकतो.
इंटरनेटची मदत घ्या
रेन तसेच रूफ वॉटर हार्वेस्टींगसाठी इंटरनेटवर माहिती उपलब्ध असते. इमारतीच्या छताचा प्रकार, भौगोलिक परिस्थिती, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण यानुसार वेबसाईटवर विविध पद्धती उपलब्ध आहेत, परिस्थितीनुरूप योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, त्याकरिता इंटरनेटची मदत घ्यावी, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.