अकाली पावसामुळे धानपीक संकटात
By admin | Published: October 26, 2014 10:37 PM2014-10-26T22:37:52+5:302014-10-26T22:37:52+5:30
तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ब्रह्मपुरी : तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हंगामाला सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली. शेतीचे काम आॅगस्ट महिन्यापर्यंत खोळंबली होेती. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन पोळ्याच्या सणानंतरही रोवणीची कामे केली. दरम्यानच्या कालखंडात धानपिके संपूर्णत: शेतकऱ्यांच्या हाती आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कालपासून हलकासा पाऊस व ढगाळ वातावरणाने जड जातीच्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले पिक पावसामुळे लोंबलेले आहे. ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीने पिकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शेतकरी हाती आलेल्या पिकांकडे पाहून चिंताग्रस्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसमोर सध्या फार मोठे प्रश्न आहेत. हाती आलेले पीक धोक्यात आले तर जनावरांचे व्यवस्थापन नीट होत नाही. जनावरांच्या चाऱ्याच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढणे आवश्यक होते. पण उत्पादनच हळूहळू धोक्यात आले आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजनही पूर्णपणे ढासळून कर्जाचा डोंगर निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांवर आलेली दिसून येत आहे.
तालुक्यातील खरीप हंगाम अशा वेगळ्या दिशेने वाटचाल करीत असल्याने येणाऱ्या रब्बी पिकांबद्दल पेरणीच्या संदर्भात शेतकरी धास्तावलेला आहे. फवारणी मारुन घाटेअळी दूर करता येऊ शकते, असेही म्हणता येत नाही. कारण धानाचा अंतिम टप्पा असल्याने फवारणीकरण्यासाठी अनुकूल वेळ नसल्याने घाटेअळीवर योग्य बंदोबस्त या वेळेस करता येत नाही. अऱ्हेर नवरगाव, गांगलवाडी, मेंडकी, एकरा, मुडझा आदी परिसरातील हजारो हेक्टरवरील पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)