पावसाचा कहर सुरूच
By admin | Published: July 11, 2016 12:44 AM2016-07-11T00:44:16+5:302016-07-11T00:44:16+5:30
गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवारीदेखील जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली.
शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या : जिल्ह्यात शेकडो घरांची पडझड
चंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवारीदेखील जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शनिवारी २२१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद सावली तालुक्यात झाली होती. येथे तब्बल ८७ घरांची अंशता पडझड झाली असून दोन घरे जमीनदोस्त झाली होती. आजही जिल्ह्यात शेकडो घरांची अंशता पडझड झाली. कोठारीजवळील नाल्यात कार वाहून चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज पावसाचा जोर कमी असल्याने शनिवारी बंद झाले अनेक मार्ग आज पूर्ववत सुरू झाले. मात्र काही ठिकाणी पूर ओसरला नसल्याने मार्ग बंदच आहेत.
काल शनिवारी जिवती तालुका वगळला तर उर्वरित १४ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर आणि रात्रीसुध्दा पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. शनिवारी पुन्हा दिवसभर पावसाने जिल्हावासीयांना झोडपून काढले. शनिवारी पावसाचा जोर अधिक असल्याने सावली तालुक्यात ८७ घरांची पडझड झाली होती तर अनेक मार्ग बंद झाले होते.
आज रविवारी पुन्हा सकाळपासून पावसाची झड कायम होती. दिवसभरातून दुपारच्या सुमारास काही वेळ पाऊस थांबला होता. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. अशातच काही वेळात पुन्हा पावसाला सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. शासकीय आकडेवारीनुसार, सर्वाधिक पाऊस सिंदेवाही तालुक्यात १८२.२० मिमी झाला. तर १५ मिमी म्हणजे सर्वात कमी पाऊस चिमूर तालुक्यात झाला. चंद्रपुरात ९८.८० मिमी, बल्लारपूर तालुका ५० मिमी, गोंडपिपरी तालुका ८८.८० मिमी, पोंभूर्णा तालुक्यात ४० मिमी, मूल-३६.६० मिमी, सावली-३० मिमी, वरोरा-३१ मिमी, भद्रावती-३० मिमी, चिमूर-१५ मिमी, ब्रह्मपुरी-१८.२० मिमी, नागभीड-५५.२० मिमी, राजुरा- ४७.६० मिमी व जिवती तालुक्यात ८८.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. (लोकमत चमू)
बल्लारपुरात सात घरे जमीनदोस्त
बल्लारपूर तालुक्यातही संततधार पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. बल्लारपूर येथील तहसीलदार विकास अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार सात गावांमधील ३५ घरांची अंशता पडझड झाली आहे तर सात घरे पूर्णता पडलेली आहेत. याच तालुक्यातील किन्ही नाल्यात कारसह चारजण वाहून गेले.
इरई धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर
मागील तीन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी-नाल्यांचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. चंद्रपूरजवळ असलेल्या इरई धरणातील जलसाठाही चांगलाच वाढला आहे. २०६.२०० मीटर एवढी पाण्याची पातळी झाली आहे. चारगाव धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग इरई धरणात होऊन इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. इरई धरणात २०७.४०० मीटरपर्यंत पाण्याची पातळली आली की धरणाचे दरवाजे उघडले जातात. आता पातळी २०६.२०० मीटरपर्यंत आली आहे.