राजीव गांधी सचिवालय बांधकामात लाखोंचा अपहार ?
By admin | Published: October 26, 2014 10:37 PM2014-10-26T22:37:35+5:302014-10-26T22:37:35+5:30
ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी
गोंडपिपरी : ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी न वापरता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असून जि.प. अंतर्गत मंजूर लाखो रुपयांचे राजीव गांधी ग्राम सचिवालये बांधकाम तालुक्यात थंडबस्त्यात असल्याने मोठा अपहार झाला की काय, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.
९८ गावाचा तालुका असलेल्या व आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात एकूण ५१ ग्रामपंचायती आहेत. शासन स्तरावरुन विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी ग्रा.पं. स्तरावर देण्यात येतो.
मात्र गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी सामाजिक योजना, पर्यावरण समृद्धी, लोककल्याण योजना या महत्वपूर्ण योजनांकडे विशेष लक्ष न देता केवळ बांधकाम व कंत्राट याकडे अधिक लक्ष घातल्याची माहिती आहे.
अशातच तालुक्यात पदाधिकारीच कंत्राटदार हा फॉर्म्यूलाही मागील बऱ्याच वर्षापासून तालुक्यात सुरू आहे. याच दरम्यान तालुक्यातील काही ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांनी कागदी पाठपुरावा व राजकीय व जनाचा वापर करुन लक्षावधींची विकास कामे खेचून तर आणली. मात्र विकास कामांचे कंत्राट स्वत:कडेच राखल्याने कामांचा गुणवत्ता दर्जा मात्र खालावलेल्या पद्धतीचा असल्याचे अविधी लोटताच नागरिकांच्या लक्षात येत असल्याची माहिती आहे.
शासनस्तरावरुन ग्रामपंचायत भवन उभारणी करीता राजीव गांधी ग्रामसचिवालय योजनेंतर्गत लक्षावधी रुपयांचा निधी मिळतो. यासाठीच तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.नी सचिवालय बांधकामास मंजुरीसह निधीही मिळविला. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अनेक ग्रा.पं.नी सचिवाल्यांचे बांधकाम सुरू केले. परंतु आजवर बांधकाम प्रगतिपथावर असल्याचे दाखवून काहींनी बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच पूर्ण निधीची उचल केल्याचीही माहिती नागरिकांकडून मिळाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून राजीव गांधी ग्राम सचिवालयांचे बांधकाम अपूर्ण असून बांधकाम निधीत मोठा अपहार झाल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. तरीही वरिष्ठांनी सदर गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)