राजोली फाल शिकार प्रकरण: ‘त्या’ वाघ शिकार प्रकरणात पुन्हा पाच आरोपींना अटक
By परिमल डोहणे | Published: October 16, 2023 07:09 PM2023-10-16T19:09:41+5:302023-10-16T19:09:46+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी परिसरातील वाघाची शिकार झाली होती.
चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत येत असलेल्या उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द परिसरातील राजोली फाल येथे दोन वाघांची शिकार मागील सहा महिन्यापूर्वी झाली होती. या प्रकरणात पाच जणांना सावली वनविभागाने गुवाहाटी येथून अटक केली आहे. त्यांना वनविभागाने न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली होती.
अर्जूनसिंग प्यारेसिंग कुरडीया (३९), ओमप्रकाश कुरडीया (४५), रामदास गोपी कुरडीया (४०), मायादेवी कुरडीया (५०), राजवती ओमप्रकाश कुरडीया (४०) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी परिसरातील वाघाची शिकार झाली होती. दरम्यान, गुवाहाटी येथे वाघाच्या कातड्यासह आरोपींना पकडल्यानंतर या शिकारी टोळीने सावली तालुक्यातील राजोली फॉल येथील दोन वाघाची शिकार केल्याचे समोर आले होते. त्याआधारावर पूर्वीच कारागृहात असलेल्या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर एका महिलेला अटक केली होती. आता आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
व्यवसायाच्या आडून शिकार
हे आरोपी जंगल परिसरात वास्तव्यास राहून विविध वस्तूंची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. मात्र त्या व्यवसायाच्या आडून वाघांची शिकार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याचे वनविभागाने सांगितले. ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक कुमार शेडगे, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या चमूंनी गुवाहाटी गाठून अटक केली. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.