कोसळलेल्या राजस्थानी जहाजला राजुरावासीयांनी दिला आधार
By Admin | Published: February 16, 2016 01:55 AM2016-02-16T01:55:04+5:302016-02-16T01:55:04+5:30
राजस्थानातून महाराष्ट्रात चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळांनी आपल्या चालू व उठू न शकणाऱ्या आजारी उंटाला राजुरा
नितीन मुसळे ल्ल सास्ती
राजस्थानातून महाराष्ट्रात चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळांनी आपल्या चालू व उठू न शकणाऱ्या आजारी उंटाला राजुरा येथील वर्धा नदीच्या तिरावर सोडून ते निघून गेले. ते असहाय्य मुके जनावर मात्र आपल्याला-कुणाचा आधार मिळेल का, या आशेने मागील १०-१२ दिवसांपासून पडून होते. यातच सहकार्याची भावना जोपासणाऱ्या राजुरा शहरातील काही नागरिकांनी गेल्या ८-१० दिवसांपासून त्या उंटाला खाऊ-पिऊ घालून औषधोपचार सुरू केले आहेत. मात्र अजुनही त्याची प्रकृती ठीक होत नसल्याने व त्याला इतर कुठला आधार मिळत नसल्याने कुणाचा तरी नक्कीच आधार मिळेल व त्या उंटाचे प्राण वाचेल, या आशेने प्रयत्न सुरू आहे.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की महाराष्ट्रात चारा व पाण्याच्या शोधात वाळवंटी जहाज म्हणून ओळखले जाणारे उंट दरवर्षी येत असतात. इतक्या लांबून येणारे हे काफीले दिवसरात्रं प्रवास करून महाराष्ट्रातील विविध भागात पाणी व चारा शोधून आपल्या जनावरांची जोपासना करतात. असाच एक काफीला काही दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातून पुढील प्रवासाकरीता जाताना दिसला. परंतू या काफील्यातील एक भला मोठा उंट आजाराने ग्रस्त होता. त्याला चालणे तर सोडाच पण उठणेही कठीण झाले होते. त्याच्या कमरेकडील भाग निकामी झाल्यासारखा आहे. अशाच स्थितीत असलेल्या व आपल्या पुढील प्रवासाकरीता चालू न शकणाऱ्या उंटाला मात्र मेंढपाळांनी निर्दयपणे वाटेतच सोडून दिले. त्यांनी त्याच्यावर उपचार करण्याचाही प्रयत्नही केला असेल. परंतु शक्य न झाल्याने जीवावर दगड ठेवून ते त्याला तिथेच सोडून निघून गेले. त्यामुळए ते असहाय्य उंट आपल्या कुणीतरी सहकार्य करेल, या आशेने पडून आहे.
अशा स्थितीत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहून दयेचा पाझर फुटला. मात्र कुणालाच काही करणे शक्य होत नव्हते. मनात असूनही काही शक्य होत नसल्याने हळहळ व्यक्त करीत लोक निघून जात होते. परंतु सहकार्याची भावना जोपासणारे राजुरा येथील प्रभात फेरी मंडळाचे रमेश सारडा, शंकर झंवर, सचिन जैन, बाबू जैन, देवीलाल त्रिवेदी, गोपाल पुरोहीत, यशवंत मेहता, राधेशाम सोनी, गोपी नावंधर, पूनम शर्मा, डॉ. कतवारे यांच्यासह इतर युवकांनी उंटाला मदत करून त्याचे प्राण वाचविण्याचे ठररविले. त्याला मागील ८-१० दिवसांपासून चारा व पाणी देत आहेत. त्यावर औषधोपचारही करीत आहे. यासाठी राजुराचे पशुधन विकास अधिकारी डॉ. झिल्लेवार यांच्या मार्गदर्शनात पशुधन पर्यवेक्षक डॉ. बलसरे, डॉ. रामटेके हे औषधोपचार करीत आहे. औषधोपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला योग्य स्थळी हलविणे गरजेचे आहे.
उंटाची प्रकृती चिंताजनक असून त्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्याला योग्य ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. त्याला हलविण्याचा प्रयत्न केल्या गेला. परंतु ते शक्य होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी क्रेनचीच आवश्यकता आहे. त्याला नेमके न्यायचे कुठे हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे.
- संदीप जैन, प्रभात फेरी मंडळ सदस्य, राजुरा
राजस्थानच्या वाळवंटी उंटाची दयनिय अवस्था झाली असून मुक्या प्राण्याला बेवारस सोडून देणे चुकीचे आहे. त्याचे प्राण वाचविणे गरजेचे आहे. राजुरा शहरातील प्रभात फेरी मंडळाचे सदस्य तसा प्रयत्न करीत आहे परंतु ते शक्य होत नसल्याने राजुरा वन विभागाने शक्य होत असल्यास पुढाकार घेऊन या उंटाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याची जोपासना करावी.
- नरेंद्र काकडे, तालुका अध्यक्ष, जैव विविधता समिती, राजुरा