चंद्रपूर जिल्ह्यात अपघातांची मालिका; राजुरा बसस्थानकाचे छत कोसळले, वर्धा नदीत ट्रक कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 10:53 AM2022-11-29T10:53:44+5:302022-11-29T10:55:25+5:30
एक ठार, एक गंभीर
राजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरातील विद्यार्थ्यांची गर्दी असणाऱ्या बसस्थानकावरील छत पडल्यामुळे एक व्यक्ती जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. ही घटना सायंकाळी घडली असती तर शेकडो विद्यार्थी जखमी झाले असते.
या बसस्थानकावर वन विभागाने झाडे तोडत असताना एक मोठे झाड बस स्टँडच्या छतावर पडले आणि अतिशय जीर्ण असलेले बसस्थानकाचे छत खाली पडले. यात एक प्रवासी जखमी झाला. बसस्थानकाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. या ठिकाणी अस्वच्छता असून राजुरा डेपोमधील बसची अवस्था सुद्धा खराब आहे. एकंदरीत प्रवास करणारे जीव मुठीत घेऊन या ठिकाणी थांबतात. बसस्थानकाची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन बसस्थानक बांधावे ही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.
दुसरीकडे, राजुरा ते बल्लारपूर मार्गावर असलेल्या वर्धा नदीत सोमवारी पहाटे एक ट्रक चालकाचे नियंत्रण बिघडल्याने कोसळला. यात एकाच मृत्यू झाला. वैभव पदमाईकर (२२) रा. बल्लारपूर असे मृताचे नाव आहे. बल्लारपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, ट्रकला बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.
वर्धा नदीवर असलेले कठडे पावसाळ्यात काढण्यात आले होते. सध्या कठड्याच्या जागी बारीक पाइप लावण्यात आले आहेत. पूर्वी हा राज्यमार्ग होता. पण, आता हा मार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे आहे. पावसाळा संपूनदेखील संबंधित अधिकाऱ्यांनी कठडे लावले नसल्याने जनतेत संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे पुलावरील पाइपचे कठडे तोडून आयचर ट्रक नदीत कोसळला. या घटनेत ट्रकचालक वैभव पदमाईकर याचा मृत्यू झाला. चालकाशिवाय ट्रकमध्ये कुणीही नव्हते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.