राजुरात लसीकरण व कोरोना चाचणी एकाच ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:43+5:302021-05-08T04:28:43+5:30
रोजच उसळते मोठी गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा सास्ती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोनाच्या प्रसारास ...
रोजच उसळते मोठी गर्दी : सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सास्ती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. कोरोनाच्या प्रसारास नागरिकांना कारणीभूत ठरविण्यात येत असले तरी मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. राजुरा शहरातील जि. प. शाळेत एकाच ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र आणि कोरोना चाचणी केंद्र असल्याने दररोज या ठिकाणी गर्दी उसळत आहे. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
प्रशासनाचे मात्र याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याकरुिता प्रशासन अथक प्रयत्न करीत आहे. विनाकाम बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. ठरवून दिलेल्या विहित वेळेत दुकान बंद न केल्यास त्यावरही कारवाई केली जाते. तर गर्दी करणाऱ्या प्रत्येक ठिकाणावर बंदी घातली आहे. गर्दी करणाऱ्यांना पांगविले जाते. परंतु, प्रशासनाच्याच गलथान कारभारामुळे मात्र गर्दी होत असेल तर नेमके काय करावे, असा सवाल राजुरावासियांनी केला आहे.
राजुरा शहरात प्रशासनाच्या वतीने कोरोनाची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्याचे केंद्र जिल्हा परिषद शाळा परिसरात ठेवण्यात आले आहे. त्याच परिसरात कोरोना लसीकरणाचेही केंद्र ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात चाचणी करणारे आणि लसीकरण करणारे एकत्रित आल्याने मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी कोणतीही सुविधा नसल्याने शाळा परिसरातील झाडांखाली सर्व नागरिक गर्दी करून एकत्रित बसून राहत आहेत. या गर्दीमुळे मात्र कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लसीकरणासाठी शहरातील वयोवृद्ध येत आहेत. तर कोरोना चाचणी करणाऱ्यांपैकी अनेक रुग्ण हे पॉझिटिव्ह निघत आहेत आणि हेच पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनाचा प्रसार करीत असल्याचे दिसून येत असतानाही प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. तातडीने लसीकरण व चाचणी केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.