राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या नव्या महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:40 PM2019-11-22T12:40:42+5:302019-11-22T13:35:42+5:30
भाजपच्या राखी कंचर्लावार चंद्रपूरच्या नव्या महापौर निवडून आल्या तर राहुल पावडे यांची उपमहापौरपदी निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. काँग्रेसनेही रणशिंग फुंकल्याने या निवडणुकीची चुरस मागील काही दिवसांपासून वाढली होती. मात्र भाजप सदस्य अखेरपर्यंत एकत्र राहिल्याने भाजपच्या राखी कंचर्लावार यांचा दणदणीत विजय झाला. राखी कंचर्लावार यांना ४२ मते तर काँग्रेसच्या कल्पना लहामगे यांना २२ मते पडली. दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तर काँग्रेसच्या सुनिता लोढिया यांनी आपले नामांकन परत घेतले.
यासोबत उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल पावडे आणि काँग्रेसचे अशोक नागापुरे रिंगणात होते. यात भाजपचे राहुल पावडे यांचा २० मतांनी विजय झाला. त्यांना ४२ मते पडली तर काँग्रेसचे नागापुरे यांनाही २२ मतांवर समाधान मानावे लागले. उर्वरित बसपा आघाडीचे अनिल रामटेके, शहर विकास आघाडीचे दीपक जयस्वाल, काँग्रेसचे प्रशांत दानव आणि मनसेचे सचिन भोयर यांनी आपले नामांकन शुक्रवारी निवडणुकीपूर्वी परत घेतले.
चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद यावेळी महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव होते. महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी आपली धडपड वाढविली होती. ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा - ६, राष्टÑवादी -२, शिवसेना - २, मनसे - २, तर चार नगरसेवक अपक्ष आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० आॅक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. चंद्रपूर महापालिका २०१२ ला अस्तित्वात आल्यापासून तीन महापौर बसले. हे तीनही महापौर महिलाच होत्या आणि आता चवथ्यांदाही महिलाच महापौर राहणार हे निश्चित होते. मागील काही दिवसांपासून मनपा वर्तुळातील राजकीय हालचालींना वेग आला होता.
दरम्यान, महापौर पदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार तर काँग्रेसकडून सुनिता लोढिया व कल्पना लहामगे यांनी नामांकन दाखल केले होते. उपमहापौर पदासाठी एकूण सहा जणांनी नामांकन दाखल केले. यात भाजपकडून विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे, शहर विकास आघाडीकडून दीपक जयस्वाल, बसपा आघाडीकडून अनिल रामटेके, काँग्रेसकडून अशोक नागापुरे, प्रशांत दानव व मनसेकडून सचिन भोयर यांनी आपले नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. ३७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच महापौर बसेल, असे जवळजवळ निश्चित होते. तरीही काँग्रेसने आपले उमेदवार महापौर पदासाठी उभे केले. फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याकडून खेळले जाण्याची शक्यता होती. ऐनवेळी फुटाफुटीचे राजकारण होऊ नये, म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना पेंच येथे सहलीला पाठविले. रविवारी दुपारीच सर्व ३७ नगरसेवक पेंचसाठी रवाना झाले. हे नगरसेवक २१ नोव्हेंबरलाच परत आले. जादुई आकडा जुळविण्यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न केला. मात्र भाजपचा कोणताही नगरसेवक पक्ष आदेशाबाहेर गेला नाही.