रॅलीतून पर्यावरण संवर्धनावर जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:03 PM2018-06-05T22:03:55+5:302018-06-05T22:04:08+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गसंवर्धन व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता चंद्रपूर वनवृत्ताच्या वतीने मंगळवारी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महानगर पालिकेचे पदाधिकारी, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्गसंवर्धन व पर्यावरण जनजागृतीच्या दृष्टीने १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता चंद्रपूर वनवृत्ताच्या वतीने मंगळवारी शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महानगर पालिकेचे पदाधिकारी, शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महानगर पालिकेपासून पथनाट्याद्वारे रॅलीला सुरुवात झाली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक मुकूम त्रिवेदी, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीमध्ये वनविभाग,वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, एसटीपीएफचे कर्मचारी व वनवविकास महामंडळाचे अधिकारी, पोलिस विभाग व इको - प्रो संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी वाघ ,बिबट, अस्वल वन्यप्राण्यांचे मुखवटे परिधान करून पर्यावरण व वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करा, असा संदेश शहरातील नागरिकांना दिला. महानगर पालिका, पटांगणातून निघालेली रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जटपुरा गेट येथून रामबाग वन वसाहत परिसरात पोहोचली. या परिसरात पोंभुर्णा येथील बहुउद्देशीय संस्थेच्या पथकाद्वारे जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले.
उमेश्वर आत्राम यांच्या मार्गदर्शनात पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कलापथकाद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या विविध पैलुंवर जनजागृती केली. याप्रसंगी महापौर घोटेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व अन्य मान्यवर उपस्थित होते. हिरे यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. निरोगी पर्यावरणाशिवाय माणूस जगू शकत नाही. महापौर घोटेकर यांनीही जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. वन विभागाने सुरू केलेल्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वन विभागात प्रेरणादायी कार्य करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.