रामाळा तलाव लिकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 06:00 AM2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:37+5:30
चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही.
राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला व शहरातील पाण्याची पातळी वाढती ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला रामाळा तलाव मागील एक ते दीड महिन्यांपासून लिकेज आहे. तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी असलेली गोंडराजाकालीन मोरीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मागील एक महिन्यात तलावातील पाण्याची पातळी तीन ते साडेतीन फुटांनी कमी झाली आहे. याकडे मत्स व्यावसायिकांंनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तलावातील पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने खालावत नाही. या तलावातील पाणी सोडण्यासाठी गोंड राजाच्या काळातच एक मोरी बांधण्यात आली होती. ती आजही कायम आहे. मात्र मागील एक ते दीड महिन्यांपासून सरदार पटेल महाविद्यालयाच्या दिशेला असलेली ही मोरी लिकेज झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. मागील काही दिवसात तलावाची पातळी तीन ते साडेतीन फूट कमी झाल्याची माहिती आहे.
परिसरातील पाणी पातळी खालावणार
रामाळा तलावातील पाण्यामुळे त्या परिसरातील पाण्याची पातळी वाढती राहते. मात्र तलावातील पाणी आता झपाट्याने कमी होत आहे. लवकरच मृतसाठ्यापर्यंत पातळी येईल. यामुळे परिसरातील पाण्याची पातळीही खालावून नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल.
तलावातील पाणी दूषित
रामाळा तलावातील पाणी अत्यंत दूषित आहे. मच्छी नाल्यातील पाणीही यात तलावात येऊन मिसळते. त्यामुळे या तलाव पाणी काढून स्वच्छ करण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे व पर्यावरणप्रेमींनी मागील वर्षी केली होती. मात्र सदर दूषित पाणी पुढे वर्धा नदीत जाईल आणि नदीदेखील दूषित होईल म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मागणी फेटाळली होती.
तलाव लिकेज असल्याबाबत आपल्याला कळले आहे. मात्र तलावातील पाणी दूषित असल्यामुळे विसर्ग होऊ दिला जात आहे. पावसाळ्यात तलावात शुध्द पाणी राहील.
- डॉ. कुणाल खेमणार,
जिल्हाधिकारी, चंद्रपूर.