मित्राच्या मदतीला धावला अन् स्वत:चाच जीव गमावला, चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 11:05 AM2023-03-06T11:05:30+5:302023-03-06T11:09:25+5:30
विचित्र घटना; मित्राला मदत करायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू
वढोली (चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील दादू उर्फ मंगेश नंदकिशोर पिंपळकर (२७) याच्या दुचाकीला त्याच्या मित्राच्याच कारने धडक दिली. यात मंगेश पिंपळकर याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृतक मंगेश हा ज्या मित्राच्या कारने धडक दिली, त्याच्या मदतीसाठी धावून आला होता. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. दोन जिवलग मित्रांच्या या विचित्र अपघाताची रविवारी दिवसभर तालुक्यात चर्चा होती.
विठ्ठलवाडा येथील दादू उर्फ मंगेश पिंपळकर व तालुक्यातीलच भंगाराम तळोधी येथील बजरंगीलाल गजानन पेदीलवार (२४) हे दोघे जिवलग मित्र असून दोघांचाही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. रेती वाहतूक हा मुख्य व्यवसाय असून दोघेही चांगले मित्र होते.
बजरंगीलाल पेदीलवार हा आपल्या कारने (क्रमांक एमएच ३४ बीव्ही ८०५५) गोंडपिपरीवरून भंगाराम तळोधीकडे जात असताना त्यांच्या कारला भंगाराम तळोधी फाट्यावर एका दुचाकीस्वाराने धडक दिली. सुदैवाने विशेष हानी झाली नाही. मात्र, दुचाकीस्वाराने पेदीलवार यांना मारायची धमकी देत, आई- वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर भीतीपोटी तो दुचाकीने सुसाट पळू लागला. त्याला अडवून समज देण्यासाठी विठ्ठलवाड्यातील मित्र दादू उर्फ मंगेश पिंपळकर याला पेदीलवारने फोन करून विठ्ठलवाड्यात त्या दुचाकीस्वाराला अडवायला सांगितले.
दादूने काही मित्रांना सोबत घेत विठ्ठलवाड्यातील शिवाजी हायस्कूल गाठले. तो दुचाकीस्वाराला अडविणार तोच दुचाकीस्वार निसटला. त्याचवेळी पेदीलवार हेदेखील कारने पाठलाग करीत दुचाकीस्वाराजवळ पोहाेचले; परंतु, संधी साधत तो दुचाकीस्वार पुन्हा यु टर्न घेत आष्टी मार्गाकडे वळला. त्याच वेळी पेदीलवार यांनीही कार यु टर्न करीत पाठलाग सुरू केला. दरम्यान पेदीलवार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् त्यांच्या कारने त्यांनाच मदत करायला आलेल्या मंगेशच्या वाहनाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दादू उर्फ मंगेश पिंपळकर यांचा जागीच मृत्यू झाला.
सर्वत्र हळहळ
या विचित्र अपघाताबाबत माहिती मिळताच ठाणेदार जीवन राजगुरू, पीएअसाय मोगरे, पोलिस कर्मचारी अनिल चव्हाण, शंकर मंने, उईके यांनी घटनास्थळी पोहाेचत मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे मृतदेह पाठविला. याबाबत पुढील तपास गोंडपिपरी करीत आहेत. मित्राच्या मदतीला धावणाऱ्या मित्रालाच असा जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक मंगेशचा तालुक्यात मोठा मित्रपरिवार असून सर्वांच्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असायचा, हे विशेष.