देवीच्या दर्शनासाठी रांगत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:09 PM2018-10-16T22:09:27+5:302018-10-16T22:10:03+5:30
देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो.
अनेकश्वर मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो. याला धार्मिकतेची जोडही मिळाली आहे. भक्तीच्या ओढीने बल्लारपूर येथील भाविकांची सहा वर्षांपासूनची दर्शनवारी सुरू आहे. बल्लारपूर ते चंद्रपूरपर्यंत १२ किमी अंतर केवळ श्रद्धेमुळे रांगत-रांगत ३६ तासांत पूर्ण करून महाकालीच्या दर्शन घेतल्या जात आहे.
राणी लक्ष्मी वॉर्डातील तारा बरमैय्या यांच्या कुटुंबीयांची देवी महाकालीच्या दर्शनवारीचे वास्तवातील चित्र आहे. देवी महाकालीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. कौटुंबीक परिस्थिती जेमतेम. मात्र सप्तमीला देवी महाकालीचे दर्शन घेण्याचा संकल्प भक्तीभाव उजागर करणारा आहे. १२ किलोमीटर अंतर रांगत प्रवास करून आदिशक्तीचा जागर धार्मिक भावना जोपासणारा आहे. किसन बरमय्या, आकाश बरमय्या, अविनाश गेडाम व गणेश तेलसे यांनी पंचमीला म्हणजे रविवारी रात्री ८ वाजता वाघाचे रूप धारण करून घरून देवी महाकालीच्या दर्शनासाठी वारी सुरू केली आहे.
महाकाली आराध्य दैवत आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान आदीशक्तीचा जागर केला जातो. संकल्पसिद्धी केली जाते.
मंगलमय वातावरण असते. सामान्य नागरिकांना राक्षसी प्रवत्तीपासून वाचविणारी त्राता म्हणून देवीचे रूप आहे. तिचे सशक्त रूप भाविकांना ओढ लावते. यामुळेच ओढीने देवी महाकालीच्या दर्शनासाठी वाघाचे रूप धारण करून रांगत प्रवास करतो, अशी माहिती किसन बरमैय्या यांनी ‘लोकमत’ला दिली. आमची देवीवर श्रद्धा आहे. भक्तीभाव जोपासतो. दैवी शक्तीचे वरदान लाभावे हीच मनिषा बाळगून सप्तमीला दर्शन घेतो, असेही त्यांनी सांगितले.
मूर्ती घडविण्यातूनच जागा झाला भक्तीभाव
आकाश बरमय्या हे विविध देवीदेवता व गणेश मूर्ती घडवितात. मूर्ती घडविण्याच्या निमित्ताने भक्तीभाव जागृत झाला. साक्षात्कार झाल्याने वाघाचे उग्ररूप धारण करून देवीपुढे नतमस्तक होण्यासाठी दर्शनवारी केल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ६ वाजता विसापूर टोल नाक्यावरुन महाकालीच्या दर्शनासाठी रांगतरांगत वारी सुरु केली. चार जण देवीची रांगत दर्शनवारी करतात तर कुटुंबातील अन्य सदस्य सोबतीला आहेत. पंचमीला सुरू झालेला भाविकांचा हा प्रवास सप्तमीला महाकालीच्या दर्शनाने पूर्ण होणार आहे. भाविकांच्या अंगी सत्वगुणांचा संचार व्हावा. मनोकामना पूर्ण व्हावी, हाच या प्रवासामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.