शॉर्टकटसाठी राँगसाईड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरु शकते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:03+5:302021-06-28T04:20:03+5:30
वाहतूक सुरळीत व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्याचा व जाणाऱ्याचा रस्ता ...
वाहतूक सुरळीत व्हावी, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्याचा व जाणाऱ्याचा रस्ता हा वेगळा-वेगळा आहे. परंतु, अनेकजण वेळ बचतीच्या नावाखाली वनवेमधून विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. असे करताना शहरात अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे,परंतु शहरातील जनता कॉलेज चौक, वरोरा नाका चौक, जटपुरा गेट, रामनगर चौक, गांधी चौक, मिलन चौकात मोठ्या प्रमाणात राँगसाईड दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना आढळून येतात. बऱ्याचदा वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे;मात्र तरीसुद्धा अनेकजण राँगसाईचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
बॉक्स
राँगसाईड : वर्षभरात जमा झाला लाखोंचा दंड
राँगसाईड वाहने चालविणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून २०० ते ५०० रुपयांचा दंड आकारला जातो. मागील सहा महिन्यात वाहतूक पोलिसांनी राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच वाहन नियमानुसार चालविण्याची तंबी दिली आहे. राँगसाईड वाहन चालविण्याचे कारण विचारताच अर्जंट दवाखान्यात जायचे असल्याचे कारण सांगतात, परंतु थोडासा वेळ वाचविण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----
वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राँगसाईड वाहन चालविणाऱ्यांवर दंड करून त्याचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी मुख्य चौक आहेत तेथे वाहतूक शिपाई नियुक्त केलेला असतो. त्यांना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते.
हृदयनाथ यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर
------
ही आहेत राँगसाईड ठिकाणे
१) वरोरा नाका चौक
वरोरा नाका चौकातून एसबीआय बँकेकडे जाताना अनेकजण राँगसाईडचा वापर करीत असल्याचे दिसून येते. या चौकात अनेकदा अपघातही झाले आहेत.
२) जनता कॉलेज चौक
या चौकात पेट्रोल पंप असल्याने अनेकजण राँगसाईड जाऊन पेट्रोल भरतात. येथे वाहतूक शिपाई राहत असून अनेकदा राँगसाईड जाणाऱ्यावर कारवाई करतात.
३)गांधी चौक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मनपाकडे जाण्यासाठी अनेकजण राँगसाईडचा वापर करतात. येथे बाजारपेठ असल्याने मोठी गर्दी असते.
४) जटपुरा गेट
रामाळा तलावाकडून जटपुरा गेटकडे अनेकजण राँगसाईड वाहन चालविताना दिसून येतात. पूर्वीच अरुंद रस्ता असल्याने येथे बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत असते.