ताफा पोहोचला शाळेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:13 PM2018-07-25T23:13:02+5:302018-07-25T23:13:24+5:30
नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित तालुक्यात आदर्श ठरलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी निघून गेला. तरी शिकवायला गुरुजी मिळाले नाही.
शंकर चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित तालुक्यात आदर्श ठरलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिनाभराचा कालावधी निघून गेला. तरी शिकवायला गुरुजी मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या पालक व गावकऱ्यांनी शाळेतील विध्यार्थ्यासह जिल्हा परिषद चंद्रपूरसमोर अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता व तसे निवेदनही संबंधित विभागाला देण्यात आले होते. परंतु अंदोलनापूर्वीच शिक्षण अधिकाऱ्यांचा ताफा शाळेत दाखल झाला. तीन शिक्षकांना तात्काळ नियुक्तीचे आदेश दिल्याने शाळेत गुरुजी येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सोमवारपर्यंत दोन विषय शिक्षक देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी देत पालकांची समजूत घातली.
१ ते ७ वर्ग असलेल्या कुंभेझरीच्या शाळेत २१८ विध्यार्थी असून एकाच शिक्षकाला सात वर्गाचा भार सांभाळावा लागत होता.
वारंवार शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला होता. दरम्यान, २५ जुलैला विध्यार्थ्यासह चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेसमोर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला होता. परंतु बुधवारी सकाळीच कुंभेझरीच्या शाळेत शिक्षण अधिकारी (प्राथ) जितेंद्र लोखंडे, उपशिक्षण अधिकारी (प्राथ.) किशोर काळे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे, पोलीस निरिक्षक नाईकवाडे, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेत भेट देत गुरुजी येण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
तत्काळ तीन शिक्षकांना नियक्तीचे आदेश दिले असून दोन विषय शिक्षक सोमवारपर्यंत पाठविण्याचे आश्वासन दिल्याने पालक व विद्यार्थ्यांच्या आशा वाढल्या आहेत.