वरोरात लहान मुलांसाठी कोविड सेंटरची जलद गतीने उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:21 AM2021-05-31T04:21:29+5:302021-05-31T04:21:29+5:30
तिसरी लाट थोपविणार : वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात १० विलगीकरण कक्ष प्रवीण खिरटकर वरोरा : कोरोना विषाणूच्या पहिला लाटेमध्ये ...
तिसरी लाट थोपविणार : वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात १० विलगीकरण कक्ष
प्रवीण खिरटकर
वरोरा : कोरोना विषाणूच्या पहिला लाटेमध्ये वरोरा तालुक्यात रुग्णसंख्या अधिक नव्हती, मात्र दुसऱ्या लाटेमध्ये शहर व ग्रामीण भागात हजारो रुग्ण आढळून आले. यात अनेक मृत्युमुखीही पडले. शहरातील अनेक रुग्णांनी घरातच विलगीकरण करून घेतले. कोरोना विषाणूची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याने लहान मुलांच्या उपचाराकरिता कोविड कक्ष उभारण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. याशिवाय दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांटलाही मंजुरी मिळाली असून, त्याचेही काम सुरू झाले आहे.
वरोरा शहरात २८ मे २०२० रोजी पिंपरी-चिंचवड येथून दुचाकी वाहनाने आलेले दांपत्य पॉझिटिव्ह आढळून आले होते. ते तालुक्यातील कोरोनाचे पहिले रुग्ण ठरले. त्यांना वरोरा शहरातील शासकीय विलगीकरण कक्षात ठेवल्यानंतर चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. पहिल्या लाटेतील कोरोनाबाधितांना चंद्रपूर येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चंद्रपूर येथील विलगीकरण कक्षात जागा नसल्याने वरोरा शहरातील शासकीय वसतिगृह, माता महाकाली पॉलिटेक्निक येथे २५० बेड्सची व्यवस्था करण्यात आली, तर ग्रामीण भागात १० विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सध्या ग्रामीण भागात विलगीकरण कक्षात एकही रुग्ण नाही. वरोरा शहरातील विलगीकरण कक्षात सध्या ३५ रुग्ण दाखल आहेत.
बॉक्स
उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिटमध्ये ऑक्सिजन बेड
दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता अधिक प्रमाणात भासू लागली. त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेड्स व ट्रामा केअर युनिटमध्ये १७ ऑक्सिजनयुक्त बेड्स देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयामध्ये ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, तर ६० सिलिंडर्स आहेत.
बॉक्स
दोन आरटी-पीसीआर, तर एक ॲंटिजन चाचणी केंद्र
वरोरा शहरातील शासकीय वसतिगृह व जुन्या नगर परिषद इमारत अशा दोन ठिकाणी आरटी-पीसीआर चाचणी केंद्र आहेत. याशिवाय शासकीय वसतिगृहात एक ॲंटिजन चाचणी केंद्रही उभारण्यात आले आहे.
बॉक्स
दोन ऑक्सिजन प्लांटला मंजुरी
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात एक, तर ट्रामा केअर युनिटमध्ये एक अशा दोन ऑक्सिजन जनरेशन प्लांटला मंजुरी मिळाली आहे. या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयात सेंट्रल पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.
बॉक्स
कोरोनाने तालुक्यात ६० व्यक्तींचा मृत्यू
वरोरा शहरातील रुग्णालय व घरात विलगीकरण असलेल्या जवळपास ६० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर न. प. प्रशासनाने अंत्यसंस्कार केल्याची माहिती न. प.चे आरोग्य निरीक्षक भूषण सालवटकर यांनी दिली.
कोट
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी १९८ मोठ्या सिलिंडर्स तर ३१ छोट्या सिलिंडर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात आणखी ३० बेड्सला ऑक्सिजनची पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू आहे. पुन्हा ३५ बेड्सची मागणी केली आहे. याशिवाय ४९ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्थाही आहे.
-डॉ. अंकुश राठोड,
वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, वरोरा
===Photopath===
300521\img_20210530_162928.jpg
===Caption===
warora