नेताजी सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेची दुर्मीळ नाणी चंद्रपुरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:29 AM2021-08-15T04:29:19+5:302021-08-15T04:29:19+5:30
चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची कीर्ती पताका जगभरात पसरत असतानाच अखंड भारताचे महत्त्व अधोरेखित करत ...
चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची कीर्ती पताका जगभरात पसरत असतानाच अखंड भारताचे महत्त्व अधोरेखित करत आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करून देणारे तत्कालीन आझाद हिंद सेनेने नागरिकांमध्ये आणलेले नाणे चंद्रपूरचे नाणे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांच्या संग्रहात उपलब्ध आहे. ही ऐतिहासिक नाणी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तेजस्वी इतिहास कथन करणारा एक मौलिक ठेवा आहेत.
देशभरातील असंख्य शूरवीरांना हौतात्म्य पत्करल्यानंतरच १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या कालावधीत दोन आण्याचे नाणे भारतात चलनात असल्याचे नमूद करून, नाणी अभ्यासक अशोकसिंह ठाकूर म्हणाले, अशा प्रकारच्या नाण्यांचे वजन ५.८० ग्रॅम होते. या नाण्यांच्या सदृश्य काही नाणी आझाद हिंद सेनेने त्याच कालखंडात तयार केली होती. चलनात असलेल्या नाण्यांच्याच वजनांचे आणि हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसणारे हे नाणे आझाद हिंद सेनेच्या देशभक्तीचे प्रतीक मानले जात असे. या नाण्याच्या एका बाजूला अखंड भारताचा नकाशा आहे. त्यावर आझाद हिंद सेना आणि १५ ऑगस्ट ,१९४७ असा उल्लेख कोरण्यात आला आहे.
बॉक्स
केवळ संदेशासाठीच, नाण्यावर रकमेचा उल्लेख नाही
आझाद हिंद सेनेच्या याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भारताचा तिरंगा झेंडा कोरण्यात आला. त्यावर जय हिंद व १५ ऑगस्ट, १९४७ असा उल्लेख आहे. कुठल्याही रकमेचा उल्लेख नाही. केवळ एखाद्या संदेश अथवा विचाराचा प्रचार करण्यासाठी जारी करण्यात आला. अशा नाण्यांना भारतीय इंडालॉजीमध्ये ‘टोकन’ असे म्हणतात, अशी माहिती अभ्यासक ठाकूर यांनी दिली.
बॉक्स
युगायुगाचा इतिहास सांगतात नाणी...
भारताची फाळणी झाल्यानंतर, त्यावर खेद व्यक्त करून पुन्हा एकदा अखंड भारताची कास धरणारी आझाद हिंद सेनेची भूमिका या नाण्यातून व्यक्त होते, असा दावा अभ्यासक ठाकूर यांनी केला. भारताच्या तिरंग्याचा सन्मान करण्याचा संदेशही या नाण्यांतून देण्याचा प्रयत्न आझाद हिंद सेनेने केला. कोणतीही नाणी त्या काळातील इतिहास सांगतात. त्यासाठी नवीन पिढी व विद्यार्थ्यांमध्ये नाण्यांचे प्राचीनत्व समजावून सांगण्यासाठी शासनाने अशा संस्था, अभ्यासक व संग्राहकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, याकडेही नाणे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांनी लक्ष वेधले.