वरोऱ्यात आढळला दुर्मिळ खवल्या मांजर
By admin | Published: July 14, 2014 01:48 AM2014-07-14T01:48:41+5:302014-07-14T01:48:41+5:30
शहरातील पदमालया नगरात राहणाऱ्या विजय पेंदरे
वरोरा : शहरातील पदमालया नगरात राहणाऱ्या विजय पेंदरे यांच्या घरी काल शनिवारी रात्री अतिशय महत्वाचे व दुर्मिळ असलेले खवल्या मांजर आढळले. सर्पमित्र अविनाश मांदाडे यांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. हे दुर्मिळ खवल्या मांजर पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
वरोरा शहरातील पदमालयानगरात राहत असलेले विजय पंदरे यांच्या घरी काल रात्री १२ वाजताच्या सुमारास दुर्मिळ खवल्या मांजर आढळले. पंदरे यांनी पहिल्यांदा हा प्राणी पाहिल्याने त्यांचे कुटुंब भयभित झाले होते. त्यांनी तात्काळ सर्पमित्र अविनाश मांदाडे यांना पाचारण केले. मांदाडे यांनी त्याला ताब्यात घेऊन हा दुर्मिळ खवल्या मांजर आहे, यापासून मानवाला कोणताही धोका किंवा नुकसान नाही, असे सांगितले. दुर्मिळ खवल्या मांजराला ‘इंडियन पॉगोलीन’ असे म्हणतात. हा प्राणी साधारणत: जंगलात आढळतो. त्याच्या अंगावर खवले असतात. त्याची लांबी अडीच ते तीन फुटापर्यंत असून तो मासाहारी आहे व तो सेड्यूल १ मध्ये मोडल्या जातो. त्याचे मुख्य खाद्य म्हणजे वाळवी, उधळ्या, मुंग्या व वारूळात राहणारे किटक आहे. सदर प्राण्याला दात नसून तो आपल्या नखांनी वारूळ पोखरून आपल्या जिभेच्या साहाय्याने भक्ष करतो. त्याचे नखे खुप मोठे असून ते बोथट असतात. त्याला धोका जाणवल्यास तो आपल्या शरिराला विशेष प्रकारची गोल गुंडाळी करतो व स्वत:चे रक्षण करतो. सर्पमित्र अविनाश मांदाडे यांनी त्याला पकडून मधुबन हॉटेलमध्ये एका पिंजऱ्यात ठेवले असता वरोरा शहरातील नागरिकांनी दुर्मिळ खवल्या मांजर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून सदर प्राण्याची नोंद करून त्याला जंगलात सोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)