चंद्रपूरच्या जनकापूर परिसरात आढळले दुर्मिळ गिधाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:21 AM2018-01-04T10:21:41+5:302018-01-04T10:22:00+5:30
निसर्गाचे सफाई दूत गिधाड पक्षाला ओळखले जाते. दुर्मिळ असा हा गिधाड पक्षी जनकापूर परिसरात आढळून आला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : निसर्गाचे सफाई दूत गिधाड पक्षाला ओळखले जाते. दुर्मिळ असा हा गिधाड पक्षी जनकापूर परिसरात आढळून आला. हा पक्षी नामशेष होत असून या पक्षाच्या संगोपनासाठी वनविभागाने हिमालयामध्ये केंद्र उभारले आहे.
गेल्या २० ते २५ वर्षानंतर प्रथमच नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील तलावालगत गिधाड पक्षी आढळून आला. हा पक्षी स्थलांतरित होऊन येथे आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून जनकापूर परिसरात हा पक्षी दिसत होता. मात्र उपासमारीने कमजोर होऊन मरणासन्न अवस्थेत आढळून आला. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही.
तेव्हा गावातील युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर पडोळे यांनी हॉले फॉरेस्ट या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती दिली. तेव्हा झेप निसर्ग संस्थेचे पवन नागरे, अमोल वानखेडे, क्षीतीज गरमळे, सतीश चारथवडे यांनी भेट देऊन गिधाडाला उपचारार्थ नागभीड येथे दाखल केले.