तळोधीत आढळला दुर्मीळ ‘ब्लॅक स्टार्क’
By Admin | Published: January 24, 2015 12:37 AM2015-01-24T00:37:13+5:302015-01-24T00:37:13+5:30
नुकतीच वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह पाळण्यात आला व या निमित्ताने संपूर्ण राज्यभर पक्षी निरीक्षण व त्यांची गणना करण्यात आली.
हरिश्चंद्र पाल तळोधी (बा)
नुकतीच वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह पाळण्यात आला व या निमित्ताने संपूर्ण राज्यभर पक्षी निरीक्षण व त्यांची गणना करण्यात आली. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातही ही पक्षी गणना करण्यात आली. या दरम्यान विविध पक्षांचे दर्शन पक्षी गणना पथकाला झाले. या परिसरात स्टार्क जातीतील दुर्मिळ विदेशी पक्षी ब्लॅक स्टार्क आढळून आला आहे. पक्षीगणना पथकासोबत पक्षीनिरीक्षण करणारे जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षक व पक्षी तज्ज्ञ व्ही. के. पवार यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. एकाच वेळी संख्येने सहा पक्षी आढळल्याने भविष्यात तळोधी (बा.) वनपरिक्षेत्र हे पक्षीतज्ज्ञांसाठी तसेच पक्षी निरीक्षकांसाठी अभ्यास केंद्र ठरु शकणार आहे.
ब्लॅक स्टार्क याला हिंदीत ‘सूरमल’ म्हणून ओळखले जाते. ब्लॅक स्टार्क हा पक्षी स्टार्क जातीतील दुर्मिळ पक्षी असून सर्वात मोठा पक्षी आहे. हा प्रामुख्याने युरोप, अफ्रीका आणि आशियात काही देशांमध्ये आढळतो. हा खूपच भीत्रा आणि लाजाळू पक्षी आहे. त्यामुळे तो नेहमी जोडप्याने किवा समुहानेच आढळतो. त्याची लांबी ९५ ते १०० सेंमी तर पंखाचा पसारा पाच ते सहा फूट इतका आहे. त्याचे वजन जवळपास तीन किलो असते. यांच्या पंखांचा वरचा भाग काळ्या रंगाचा व हलक्या जांभळ्या हिरवा रंगाचा असतो. त्याचे पाय लांब व चोच लाल रंगाची असते. नर व मादी सारखेच दिसतात. परंतु नर हा मादीपेक्षा थोडा मोठा असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हे पक्षी पूर्व आशियातून सायबेरिया, चीन, तसेच पश्चिम आशिया, मध्य युरोप, उत्तर दिशेला पोलंड, जर्मनी, चेक रिपब्लिकन, हंगेरी आणि दक्षिणतील ग्रीक देशात तर थंडीच्या दिवसांत युरोप, दक्षिण आफिका ते भारत, नेपाळ आणि म्यानमारकडे कूच करतात. एका दिवसांत हा पक्षी २५० ते ३०० किमी पर्यंत प्रवास करतो. ब्लॅक स्टार्क युरोपमध्ये एप्रिल ते मे महिन्यात उंच झाडावर फांद्याच्या मदतीने मोठी घरटे तयार करतात. या घरट्यात मादी तीन ते पाच पांढरी अंडी देतात. थंडीच्या काळात भारतात, तसेच महाराष्ट्रातील झरे, तलाव, नदी व सरोवराच्या काठावर हे पक्षी मुक्तसंचार करीत असतात.
तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रात प्रथम चरणात झालेल्या पक्षीगणना कार्यक्रमात हा पक्षी नागभीड तालुक्यातील घोडाझरी जंगलाच्या परिसरातील सारंगडाड क्षेत्राच्या तलावावर नवोदय विद्यालयाचे शिक्षक व पक्षी निरीक्षक पवार यांना हे सहा पक्षी आढळले. यांपैकी दोन पक्षी अजूनही या परिसरात दिसत आहेत. आकाराने हे पक्षी युरोपीय व्हाईट स्टार्कपेक्षा थोडे छोटे असतात. अशा या दुर्मिळ विदेश्ी प्रवाशी पक्षांची वनविभाग, पक्षी मित्र व ग्रामीण जनतेने संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या पाहुण्या पक्षांची शिकार होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे वन विभागानेही अभियान राबवून त्यांच्या संरक्षणासाठी पाऊल उचवावे, असे मत या पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले.