रश्मीने साकारली मसूरच्या डाळीपासून हनुमानाची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:13+5:302021-04-30T04:36:13+5:30
उलटे चित्र काढण्यात रश्मी तरबेज : परिस्थितीवर मात करत शिक्षणा सोबतच जपते कला राजुरा : येथील रश्मी ...
उलटे चित्र काढण्यात रश्मी तरबेज : परिस्थितीवर मात करत शिक्षणा सोबतच जपते कला
राजुरा : येथील रश्मी गजानन पचारे हिने मसूरच्या डाळीपासून हनुमानाची प्रतिकृती तयार केली.
हनुमान जयंतीला रश्मीने आपल्या कलेच्या माध्यमातून ही प्रतिकृती साकारून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
यापूर्वीही तिने आपल्या कलेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चित्र काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. रश्मीला डॉक्टर बनायचे आहे. ते स्वप्न उराशी बाळगून तिने आपला शैक्षणिक प्रवासही सुरू केला आहे. अत्यंत हुशार आणि चित्रकलेत ती तरबेज आहे. विशेष म्हणजे उलटे चित्र काढण्यात तिचा चांगलाच हातखंडा आहे. आर्थिक परिस्थिती जरी बिकट असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने आपला शैक्षणिक आणि कलात्मक गुण जोपासत प्रवास सुरू केलाय. आजपर्यंत तिने अनेक चित्र काढले असून त्यातून काही आर्थिक मदत तिला झाली आहे. परंतु मोठ्या मेट्रो सिटीपेक्षा ग्रामीण भागात तिच्या कलेला मिळणारा प्रतिसाद अल्प आहे, ही खंत मात्र तिच्या मनात आहे. या होतकरू विद्यार्थिनीला भविष्यात डॉक्टर बनायचे आहे. त्याकरिता दिवसरात्र ती अभ्यास करीत आहे. सोबत आपल्या अंगी असलेला चित्रकारही तिने जपलेला आहे. नेहमी नावीन्यपूर्ण विषय घेऊन त्यावर चित्रकलेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करण्याची तिला सवय आहे. एरवी सरळ बसून चित्र काढणे किती कठीण असते; पण रश्मी मात्र उलटे चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हातात ब्रश किंवा खडू घेऊन ती क्षणात चित्र साकारते.