रसवंती, शीतपेय व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:06+5:302021-05-27T04:30:06+5:30
चंद्रपूर : उन्हाचा पारा वाढला की, सर्वांचे लक्ष जाते ते थंडगार पाणी, शीतपेय तसेच उसाच्या रसाकडे. मात्र ...
चंद्रपूर : उन्हाचा पारा वाढला की, सर्वांचे लक्ष जाते ते थंडगार पाणी, शीतपेय तसेच उसाच्या रसाकडे. मात्र सध्या सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शीतपेय, रसवंतीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाऊमुळे उन्हाळ्यातील व्यवसाय म्हणजे, कोल्ड्रिंक, रसवंती, आईस्क्रिम सेंटर बंद पडली आहेत. हे व्यावसायिक चार महिन्यांत वर्षभराचे जागा भाडे देऊन व्यवसाय करतात. उन्हाची तीव्रता पाहता, फेब्रुवारी महिन्यात शीतपेय व्यावसायिक मालाची खरेदी करून ठेवतात. यामध्ये काहींना याचासुद्धा फटका बसला आहे. लॉकडाऊन कायम असल्याने हे व्यवसाय बंद आहेत. या व्यावसायिकांना जागेच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. व्यवसायाशी निगडीत मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, आता पावसाचे दिवस अगदी जवळ आले आहेत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीचाही सिझन गेल्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, नोंदणीकृत मजूर तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे अशांना प्राधान्यक्रम तसेच अंत्योदय कार्डधारकांना महिन्याकाठी धान्य मिळते. मात्र रसवंती, शीतपेय व्यावसायिकांची कुठेच नोंद नसल्यामुळे तसेच हा व्यवसाय काही दिवसांपुरताच मर्यादित असल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.
बाॅक्स
चार महिन्यांवर वर्षभराचे आर्थिक गणित
उन्हाळ्याचे चार महिने हे व्यावसायिक आपला व्यवसाय करतीत. त्यानंतर वर्षभर या पैशातून इतर छोट-छोटे व्यवसाय करून पोट भरतात. यामध्ये उदरनिर्वाहासह इतरही कामे आटोपतात. मात्र मागील वर्षीपासून या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बाॅक्स
बाहेर राज्यातील अनेकांचा समावेश
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे इतर जिल्ह्यांसह बाहेरील राज्यातील मजूर, कामगार मोठ्या संख्येने येथे काम करतात. अनेकांनी रसवंती तसेच इतर छोटे-मोठे काम सुरू करून उदरनिर्वाह सुरू केला आहे. मात्र कोरोना संकटामुळे या सर्वांवर मोठा परिणाम झाला आहे. गावाकडे गेले, तर काम नाही आणि येथेही उपासमार अशी, काहीशी अवस्था त्यांची झाली आहे.