आधार कार्डशी लिंक होणार शिधापत्रिका

By admin | Published: May 30, 2016 01:14 AM2016-05-30T01:14:42+5:302016-05-30T01:14:42+5:30

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण होण्याकरिता शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांची माहिती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती आधार क्रमांकासोबत जोडली जोणार आहे.

Ration card linking to Aadhaar card | आधार कार्डशी लिंक होणार शिधापत्रिका

आधार कार्डशी लिंक होणार शिधापत्रिका

Next

शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान : १५ जूनपर्यंत फॉर्म सादर करण्याचे निर्देश
चंद्रपूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण होण्याकरिता शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांची माहिती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती आधार क्रमांकासोबत जोडली जोणार आहे. त्यानंतर बायोमेट्रिक शिधापत्रिका लाभार्थ्यांना दिली जाणार आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण करण्यासाठी शासनाकडून अत्यंत महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांकडून ३१ मार्च २०१६ पूर्वी कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील, आधार क्रमांक, आधार नोंदणी क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, घरगुती गॅस जोडणी संंबंधीची माहिती विहित नमुन्यात भरून द्यावयाची आहे. शिधापत्रिकाधारकांना भरावयाचा अर्ज रास्तभाव दुकानात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शिधापत्रिकाधारक, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, गॅस एजन्सीचे नाव, गॅस कार्ड आदी माहितीसह संपूर्ण तपशील तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांची डाटा एंट्री झालेली नाही, अपूर्ण डाटा एंट्री झालेली आहे, अशा शिधापत्रिकाधारकांनी विहित कोऱ्या फॉर्ममध्ये ही माहिती तपशीलवार भरणा करावी. फॉर्म ३१ मार्च २०१६ पूर्वी रास्तभाव दुकानदारांकडे जमा करावयाचे होते. याबाबत नागरिकांना वारंवार कळविण्यात आले.
संगणकीकरणातून कुणीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याकरिता प्री-प्रिन्टेड फॉर्म अचूक भरणा करून आपली शिधापत्रिका संलग्नित असलेल्या रास्तभाव दुकानदाराकडे संकलित करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून मुनादीद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन माहिती देण्यात आली होती. परंतु, अजूनपर्यंत जिल्ह्यातील बऱ्याच कार्डधारकांनी त्यांच्या आधार क्रमांकासह इतर माहितीचा तपशील संबंधित दुकानदारांना दिला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
शिधापत्रिकाधारकांस प्री-प्रिन्टेड फॉर्म उपलब्ध करून देऊन जवळ जवळ एक वर्षाचा कालावधी लोटला. मात्र, शिधापत्रिकाधारकांनी कोणतीही माहिती रास्तभाव दुकानदारांकडे दिली नाही. ज्यांनी विहित अर्ज रास्तभाव दुकानदारांकडे सादर केला नाही, त्यांनी १५ जूनपूर्वी संपूर्ण माहिती सादर करावी. त्यानंतरही माहिती न दिल्यास धान्याची आपणास आवश्यकता नसल्याचे गृहीत धरून आपले नाव योजनेतून वगळण्यात येईल. (शहर प्रतिनिधी)

अर्ज तातडीने जमा करावे
आधार क्रमांकाची जोडणी ही शासनाच्या विविध योजना यशस्वीरीत्या व पारदर्शकतेने राबविण्याकरिता अत्यावश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता शिधापत्रिकेस आधार क्रमांकाची जोडणी करणे गरजेचे आहे. सबब विलंब न करता शासनाच्या विविध योजनांसह शिधावस्तूंचा लाभ नियमित सुरू राहण्यास्तव विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये अद्ययावत माहिती नमूद करून संंबंधित रास्तभाव दुकानदाराकडे जमा करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Ration card linking to Aadhaar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.