मनपाच्या स्थायी समितीपदी रवी आसवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:37+5:302021-02-06T04:52:37+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभापतिपदासह झोन सभापती व महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडणुकीत ...
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभापतिपदासह झोन सभापती व महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले असून स्थायी समिती सभापतिपदी रवी आसवानी हे निवडून आले आहेत.
महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी चंद्रकला सोयाम तर उपसभापतिपदी पुष्पा उराडे यांची निवड झाली आहे. झोन क्रमांक १ च्या सभापतीपदी ॲड. राहुल घोटेकर, झोन क्रमांक २ च्या सभापतिपदी संगीता खांडेकर तर झोन क्रमांक ३ च्या सभापतीपदी अंकुश सावसाकडे यांची निवड झाली आहे.
मनपाच्या स्थायी समितीत १६ सदस्य असून यात भाजपाचे १० सदस्य व इतर सहा सदस्य आहेत. भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याने भाजपाचा नगरसेवकच सभापतिपदी विराजमान होईल, हे स्पष्ट होते. मात्र यापूर्वी सतत चार वर्ष राहुल पावडे हेच स्थायी समितीचे सदस्य राहिले. त्यानंतर उपमहापौर म्हणून त्यांचीच वर्णी लागली. त्यामुळे भाजपाचे काही नगरसेवक असंतुष्ट होते. विरोधातील सहा सदस्य एकत्र करून असंतुष्ट सदस्य भाजपाचे सदस्य फोडेल, अशी भीती असल्याने सर्व सदस्यांना एकत्र करून ताडोबा येथे सहलीला पाठविण्यात आले होते. याशिवाय झोन क्रमांक ३ मध्ये अंकुस सावसाकडेसह नगरसेवक स्नेहल रामटेके यांनीही अर्ज घेतला होता. त्यामुळे येथे चुरस वाढेल, असे वाटले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी आपला अर्ज मागे घेतला.