खावटी योजना आदिवासींपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:35+5:302021-07-17T04:22:35+5:30
चंद्रपूर : कोरोना आपात्कालीन परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात, तर उर्वरित ...
चंद्रपूर : कोरोना आपात्कालीन परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना पहिल्या टप्प्यात दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात, तर उर्वरित ५० टक्के अंतर्गत धान्य किराणा स्वरूपात खावटी किट दिली जाते. ही योजना गरजू आदिवासींपर्यंत तातडीने पोहोचवा, अशा सूचना आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.
जिवती तालुक्यातील पाटण येथे खावटी अनुदान योजनेंतर्गत किट वाटप करताना ते बोलत होते.
यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिवती पं.स. सभापती अंजना पवार, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, पाटणच्या सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच भीमराव पवार, माजी. जि.प. सदस्य भीमराव मडावी, राजेंद्र वैद्य उपस्थित होते.
राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. गावागावांत जाऊन आदिवासींच्या अडीअडचणी जाणून घेणे, तसेच त्यांच्यापर्यंत खावटी अनुदान योजनेचा लाभ पोहोचावा. जिल्ह्यात २० हजार आदिवासी बांधवांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सुटलेले पात्र लाभार्थी आपली नावे नोंदवू शकतात. राज्याच्या एकूण निधीच्या खर्चापैकी आदिवासी विकास विभागावर ९.५ टक्के निधी खर्च केला जातो, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
आमदार धोटे म्हणाले, पाटणमध्ये ९० टक्के आदिवासी असून, जिवती तालुक्यात हे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. खावटी अनुदान योजनेसाठी आश्रमशाळेच्या स्टाफने लाभार्थ्यांचा शोध घ्यावा. शबरी घरकुल योजनेकरिता निधी उपलब्ध करून द्यावा. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सानूबाई आत्राम, लैजू सिडाम, यशवंत पैकू उईके, सुरेश इसरू सोयाम, दशरथ भुरुजी मडावी, भीमराव जैतू मडावी, पग्गू राजू आत्राम यांच्यासह ४१ जणांना खावटी अनुदान योजनेंतर्गत किट वाटप आणि आश्रमशाळा परिसरात पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले. संचालन मुख्याध्यापक वासुदेव राजपुरोहित यांनी केले. आभार सहायक पोलीस निरीक्षक सुनील बावणे यांनी मानले.