‘हॅलो चांदा’ने फोडली जनसमस्यांना वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:27 PM2017-08-24T23:27:18+5:302017-08-24T23:30:51+5:30

Read 'Haila Chanda' to the masses | ‘हॅलो चांदा’ने फोडली जनसमस्यांना वाचा

‘हॅलो चांदा’ने फोडली जनसमस्यांना वाचा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेला उदंड प्रतिसाद : तक्रारींबाबत जिल्हा प्रशासन गंभीर

राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सरकारी काम आणि सहा महिने थांब.. अशीच काहीशी परिस्थिती. शेतकºयांना सातबारासाठी.. विद्यार्थ्यांना विविध दाखल्यासाठी.. वृद्धांना निराधारच्या मानधनासाठी.. रोहयो मजुरांना मजुरीसाठी.. कुठे रस्ते नाही, तर कुठे रस्ते असूनही असंख्य खड्डे आहेत, अशा नानाविध समस्यांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून अनेकांचे अर्धे आयुष्य निघून गेले. मात्र काम काही झाले नाही अशांचीही संख्या कमी नाही.
चंद्रपूरचे सुपुत्र राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या राजकीय प्रवासात सामान्य माणसांच्या व्यथा आणि वेदना जवळून बघितल्या आहेत. सामान्यजणांच्या समस्या सोडवायच्या असेल, तर प्रशासकीय यंत्रणेला जागविले पाहिजे, तरच जनता आणि प्रशासनात निर्माण झालेला दुरावा कमी करता येईल, या माध्यमातून जनसमस्या सोडविल्याचे काम आपल्या हातून घडेल, या हेतूने जनसेवेची नाळ जुळविणारी ही कल्पना त्यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यामार्फतीने प्रत्यक्षात साकारली ती पालकमंत्री तक्रारनिवारण यंत्रणेच्या माध्यमातून ‘हॅलो चांदा’ या टोल फ्री हेल्पलाईनद्वारे...
१८००-२६६-४४०१ या टोल फ्री क्रमांकावर हॅलो चांदा म्हणताच आदराने पुढल्या व्यक्तीची समस्या विचारली जातात आणि ती समस्या संबंधित विभागाकडून सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू होतो. अगदी कुणीही सहज आपली समस्या सोडविण्यासाठी संपर्क करू शकतो. केवळ ही यंत्रणा उभी करून पालकमंत्री मोकळे झाले नाही, तर त्यांनी प्र्रत्येक तक्रारींवर आपला ‘वॉच’ ठेवला आहे. या संकल्पनेला मूर्त रूपात पुढे नेण्याची महत्त्वाची भूमिका जिल्हाधिकारी आशुतोष सलील स्वत: व अधिनस्त यंत्रणेमार्फत वठवित आहे. ‘हॅलो चांदा’ ही हेल्पलाईन सुरू झाल्यापासून महिनाभरात तब्बल ५७८ तक्रारी सोेडविण्यात आल्या, तर ८०८ तक्रारी प्रलंबित आहेत. त्याही सुटतील, यासाठी यंत्रणा राबत आहे. अनेक हेल्पलाईन आल्या, मात्र अल्पावधीतच इतक्या तक्रारींची दखल घेणारी ही देशातील पहिली हेल्पलाईन सेवा ठरली. हे उल्लेखनीय.

भाडेकरूला दोघेच असताना ४,५०० रुपये वीज बिल आले. संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारल्या, परंतु आधी बिल भरा नंतर ते कमी करून देऊ, असेच उत्तर मिळायचे. ‘हॅलो चांदा’वर तक्रार नोंदविली. लगेच दखल घेऊन महावितरणचे कर्मचारी घरी आले. त्यांनी मीटर तपासणीसाठी काढून नेले आहे. आणि नाममात्र एक हजार रूपये बिल जमा केले आहे. मीटर दुरुस्तीनंतर पुढील निर्णय होणार आहे. दुसरी एक रस्त्याबाबत तक्रार केलेली आहे. ती जि.प. अंतर्गत येते.
- चरणदास रामटेके, जगन्नाथबाबा नगर, चंद्रपूर
शालेय आवारात बीएसएनएलचा टॉवर आहे. त्याचा लहानमुलांवर परिणाम होतो. त्यावर विद्यार्थी चढतात. ते टॉवर हटविण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र कुणाही दखल घेतली नाही. अखेर ‘हॅलो चांदा’वर तक्रार नोंदविली. सदर तक्रार गोंडपिपरी बीडीओंकडे पाठविली. त्यांनी ग्रामपंचायतीकडे वळती केली आहे. तक्रारीचे निवारण होईल, अशी आशा आहे.
- सुरज माडुरवार, वढोली ता. गोंडपिपरी.

दीड वर्षांपूर्वी भूखंड खरेदी केला. त्याचे फेरफारसाठी वर्षभरापासून संबंधित विभागाकडे चकरा मारत आहे. फेरफार झाले नाही. ‘हॅलो चांदा’वर तक्रार केली असता लगेच दखल घेतली. तक्रारीच्या आधारे संबंधित विभागात आॅनलाईनवर काम सुरू असल्याने उशीर होत असल्याचे सांगण्यात आले.
- आशिषकुमार श्रीवास्तव, मालवीय वॉर्ड, वरोरा.

तलाठी साझा क्र. २० च्या महिला तलाठी वृद्ध,विद्यार्थी व शेतकºयांना त्यांच्या कामासाठी पैसे मागतात. नऊ ग्रामपंचायतींनी याबाबत तक्रार उपविभागीय अधिकाºयांकडे केलेली होती. मात्र त्यांनी पाठराखणच केली. ‘हॅलो चांदा’वर तक्रार करताच उपविभागीय अधिकाºयांनी तहसीलदारामार्फत चौकशी सुरू केली आहे.
-निलेश पुलगमवार, रा. हिवरा, ता. गोंडपिपरी.

मी दिव्यांग आहे. आधार कार्डसाठी बोटाचे ठसे बरोबर येत नसल्यामुळे आधार कार्ड येत नव्हते. यामुळे नायब तहसीलदाराने आधार कार्डसाठी ८-९ महिन्यांपासून संजय गांधी निराधारचे मानधन अडवून ठेवले. तहसीलदाराकडे तक्रार केली होती. उपयोग झाला नाही. ‘हॅलो चांदा’ची माहिती मिळाली आणि संपर्क साधला. लगेच तहसीलादाराला फोन आला आणि त्यांनी मला बोलावून माझ्याकडून आधारसाठी मिळालेली पावती मागितली आणि दोन महिन्यांचे मानधनही दिले. या सेवेमुळे माझे मानधन मला मिळाले, याबद्दल मी या सेवेचा आभारी आहे.
- प्रकाश शरकुरे, रा. खांबाडा ता. चिमूर.

वाघाच्या हल्ल्यात सविता वामन कोकोडे ही महिला जखमी झाली. तिला आतापर्यंत दहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली. मात्र तिचे घाव भरले नाही. रक्तस्त्राव होतो. गरीब आहे. दोन मुले आहे. ती उपचार करू शकत नाही. तिला मदत मिळावी, यासाठी हॅलो चांदावर तक्रार केली आहे. दखल झालेली नाही. पण आशा आहे.
- विलास मेंढारे, वाखल ता. सिंदेवाही

मी ट्रॉन्सपोर्टमध्ये काम करतो. येथे बाहेर गावच्या अनेक चालकांचे पैसे चोरीला जातात. मात्र कुणीही तक्रार करत नाही. यासाठी हॅलो चांदावर तक्रार केली. लगेच येथील ठाणेदाराने चौकशी केली. नवीन ठाणेदाराने सर्व चालकांना चौकशीसाठी बोलाविले आहे. दखल घेतल्यामुळे मला समाधान वाटले.
- बबलू भडके, पडोली, ता. चंद्रपूर.

हा उपक्रम निरंतर जनसेवेत ठेवायचाय
लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. वेळ लागलील, परंतु प्रत्येक तक्रार सोडविली जाईल. अधिकाºयांशी समन्वय साधून आहोत. तक्रारी प्राप्त होताच संबंधित अधिकाºयांशी पत्र व्यवहार होत आहे. यात कामेही होत आहे. ज्या तक्रारी सुटलेल्या नाहीत त्या दर सोमवारी स्वत:कडे मागवून घेत असतो. मंगळवारी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्याचा आढावा घेणे सुरू आहे. या उपक्रमाला व्यापक स्वरूप द्यायचे आहे. हा उपक्रम बंद होऊ देऊ नये, अशी लोकांचीच मागणी व्हायला पाहिजे. अधिकारी निघून गेले की असे उपक्रम बंद पडतात. परंतु हा उपक्रम बंद होणार नाही. याची पूर्ण खबरदारी घेतली जाणार आहे. राज्यात वा देशात कुठेही असो तेथून कुणी आणि किती तक्रारी प्राप्त झाल्या हे बघण्याची व्यवस्था या यंत्रणेत आहे. मॉनिटरींगला अधिक महत्त्व दिलेले आहेत. तक्रारकर्त्यांचे समाधान झाले वा नाही याची शहानिशा केली जात आहे. अनेक लोक दररोज आपणाकडे कामे घेऊन येतात. त्यात वृद्धही असतात. त्यांना हॅलो चांदावर तक्रार नोंदविण्यास सांगतो आणि ती सुटली वा नाही याचीही शहानिशा करीत आहे.
- आशुतोष सलील, जिल्हाधिकारी,
चंद्रपूर

 

Web Title: Read 'Haila Chanda' to the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.