पेंशनर्सच्या जीवित दाखल्याचा त्रास वाचणार
By admin | Published: March 3, 2017 12:53 AM2017-03-03T00:53:58+5:302017-03-03T00:53:58+5:30
कोल इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाकरिता आपण जीवंत असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.
कोळसा खाण कामगारांसाठी सुविधा : बायोमेट्रिक जीवन प्रमाणपत्र नोंदणी शिबिर प्रारंभ
दुर्गापूर : कोल इंडियाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाकरिता आपण जीवंत असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. मात्र, आता ही प्रक्रिया आॅनलाईन करून आधारकार्डशी खाते जोडण्यात येत आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना जीवंत असल्याचा दाखला देण्याची गरज राहणार नाही. त्याकरिता बायोमॅट्रिक जीवन प्रमाणपत्र नोंदणी शिबिर दुर्गापूर येथील आॅडिटोरियममध्ये १ ते ४ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे.
कोल इंडियाच्या मिनीरत्न कोळसा कंपनीतून प्रत्येक महिन्यामध्ये कर्मचारी निवृत्त होत असतात. या निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवन सुखकर जावे, यासाठी निवृत्तीवेतन दिले जाते. निवृत्तीवेतन नियमित मिळण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवित असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. ही क्लिष्ट पद्धती बाहेर गावातील वयोवृद्ध व आजारी निवृत्तीवेतनधारकांना त्रासदायक ठरली आहे. ही प्रक्रिया अधिक सोपी व सरळ करण्याकरिता केंद्र सरकारने निवृत्तीवेतनाला डी.बी.टी. मिशनमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला.
या नोंदणी शिबिरात चंद्रपूर, बल्लारपूर, वणी, वणी (उत्तर), माजरी या वेकोलिच्या पाच क्षेत्रातील आठ हजार निवृत्तीेवेतनधारकांना लाभ मिळणार आहे. त्याकरिता धनबाद येथील कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संघटनेचे आयुक्त बी. के. पंडा यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत विभाग-२चे संयुक्त आयुक्त यू. पी. कमल, बोर्ड सदस्य मोहन झा, क्षेत्रीय आयुक्त ए. के. केशव, वेकोलिच्या चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक विश्वजीत प्रधान आदी उपस्थित होते.
जिवंत असल्याचे प्रमाणपत्र घरातून सादर
बायोमॅट्रिक पद्धतीमुळे कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याकरिता कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संघटना आधार क्रमांक एकत्र करून केंद्र सरकारच्या निकच्या वेब पोर्टलशी जोडून बँक खात्याच्या माहितीसह नोंदणी करीत आहे. या नोंदणीनंतर निवृत्तीवेतनधारकांना प्राप्त आयडीवरून देशाच्या कोणत्याही भागातून घरी बसून वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. या बायोमॅट्रिक नोंदणीसाठी आधार क्रमांक, निवृत्तीवेतन आॅर्डर क्रमांक आणि बँकेच्या पासबुकची गरज आहे.
कोळसा खाण निवृत्तीवेतनधारकांना बँकाकडे दरवर्षी जीवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. तयात त्यांना त्रास सहन करण्यासह निवृत्तीवेतन बंद होण्याची पाळी येते. या त्रासदायक प्रक्रियेला सहज व सोपे करून घरी बसून जीवन प्रमाणपत्र बँकेत सादर करता यावे, याकितर देशात सर्वत्र बायोमॅट्रिक जीवन प्रमाणपत्र नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
-बी. के. पंडा, आयुक्त,
कोळसा खाण भविष्य निर्वाह निधी संघटना, धनबाद.