रेल्वेच्या विलगीकरण ट्रेनची आता खरी गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:47+5:302021-04-22T04:28:47+5:30
कोरोनाने देशात शिरकाव करण्याच्या प्रारंभीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या विलगीकरणाकरिता मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने डब्यांमध्ये विलगीकरण याची पुरेपूर व्यवस्था असणारी १९ ...
कोरोनाने देशात शिरकाव करण्याच्या प्रारंभीच्या दिवसांत कोरोनाबाधितांच्या विलगीकरणाकरिता मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने डब्यांमध्ये विलगीकरण याची पुरेपूर व्यवस्था असणारी १९ डब्यांची एक खास गाडी तयार केली होती. एका गाडीत एकाच वेळी सुमारे १०० जण विलगीकरणात राहू शकतील, अशी व्यवस्था होती. नागपूर, वर्धा आणि बल्लारशा या रेल्वे स्थानकांवर गरजेनुसार या गाड्या ठेवण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र आणि विपुल प्रमाणात विलगीकरणाची सोय झाल्यामुळे रेल्वेच्या या खास आयसोलेशन ट्रेनची गरज पडली नाही. तरीही काही दिवसांकरिता म्हणून एक ट्रेन बल्लारशा स्थानकावर आणून ती प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी ठेवण्यात आली. मात्र, बाधितांची इतरत्र सोय झाल्याने या ट्रेनचा उपयोग झाला नाही. दोन-तीन दिवसांनंतर या ट्रेनला येथून परत पाठविण्यात आले. आता, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आलेली आहे. विलागीकरण कक्ष अपुरे पडत आहेत. त्यामुळे, रेल्वेच्या त्या खास गाडीची आता गरज भासू लागली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर, वर्धा आणि आमला येथे आयसोलेशन कोच तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. चंद्रपूर वा बल्लारशा रेल्वे स्थानकावरही तसे कोच तयार करता येऊ शकतात. त्याकरिता लोकप्रतिनिधींचा पुढाकार हवा. त्याची गरज आहे.