ढिगाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांचे वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:34+5:302021-06-18T04:20:34+5:30
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. ...
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्य प्राण्यांचा या ठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे हे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहे.
जुन्या वाहनांना कालबाह्य करावे
घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
गावांना रस्त्याची प्रतीक्षा
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वे मार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा नागरिकांना सोईचे होणार आहे.