रुग्णालयाजवळील प्रवासी निवारा घाणीच्या साम्राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:07+5:302021-04-13T04:27:07+5:30
मूल : मूल-चंद्रपूर महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला प्रवासी निवारा घाणीच्या साम्राज्यात असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. मूल ...
मूल : मूल-चंद्रपूर महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला प्रवासी निवारा घाणीच्या साम्राज्यात असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
मूल नगर परिषद स्वच्छता मिशन राबवीत असून, शहरात त्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र मूल-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या या प्रवासी निवाऱ्यात घाणयुक्त कपडे, विटा, दारूच्या बाटल्या, कचरा आदीमुळे प्रवासी निवारा घाणीच्या विळख्यात आहे. नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात आहे.
नगर परिषद मूलच्या मूल शहरात सन.२०१८ १९ या वर्षात महाराष्ट्र राज्य सुवर्ण नगरोत्थान निधीअंतर्गत २६ लाख ८७ हजार ८४३ रुपये खर्च करून सात आधुनिक प्रवासी निवारे बांधण्यात आले. यात एकूण आठ प्रवासी निवारे बांधायचे होते. मात्र उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेला प्रवासी निवारा यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला असल्याने नगर परिषदेने सदर ठिकाणी प्रवासी निवारा बांधला नाही. याबाबत पूर्णपणे देखभाल करणे नगर परिषदेची जबाबदारी असताना मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महामार्गावर सदर प्रवासी निवारा असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी प्रवासी निवारा लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आला. उद्देश हाच की जनतेला त्याचा फायदा व्हावा. मात्र नगर परिषद मूलच्या दुर्लक्षितपणामुळे प्रवासी निवारा घाणीच्या विळख्यात सापडला असून, याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.