पाण्याच्या टाकीत जंतू व घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:28 AM2021-03-10T04:28:58+5:302021-03-10T04:28:58+5:30
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही व पवनपार तसेच पाथरी या गावाला पाणीपुरवठा पवनपार प्रादेशिक योजना असोलामेंढा तलावातून होते. ...
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही व पवनपार तसेच पाथरी या गावाला पाणीपुरवठा पवनपार प्रादेशिक योजना असोलामेंढा तलावातून होते. असोलामेंढा तलावात ही योजना कार्यान्वित असून पाणीपुरवठा पाण्याच्या टाकीद्वारे होतो.
अनेक दिवसांपासून पाण्याच्या टाकीची साफसफाई झाली नाही. पाण्याच्या टाकीत जंतू आणि घाण मोठ्या प्रमाणात साचली आहे. या पाण्याचा कोणतेही शुद्धीकरण न होता नळाद्वारे पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या गुंजेवाही ग्रामपंचायतीच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लगेच कंत्राटदारांना फोन करून परिस्थितीशी अवगत केले. यावेळी ठेकेदार आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची बाब पुढे आली. पाण्याच्या टाकीजवळ जंतू आणि घाण मोठ्या प्रमाणावर दिसून आली. एक महिन्यापासून फिल्टर मशीन बंद आहे. तरीसुद्धा कंत्राटदार व कर्मचारी कोणालाही न सांगता मनमानी कारभार करीत असल्याची बाब दिसून निदर्शनास आली.
कंत्राटदार फोनच उचलत नाही
ठेकेदाराला सतत सात दिवस फोन केला., पण तो फोनच उचलत नाही. अधिकाऱ्यांनाही सांगितले मात्र तेसुद्धा उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. आसोलामेंढा तलावातून शुद्धीकरण न होताच पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.