मालमत्ता करावरून पुन्हा खडाजंगी
By admin | Published: April 28, 2016 12:39 AM2016-04-28T00:39:17+5:302016-04-28T00:39:17+5:30
मालमत्ता कराचा मुद्दा महापालिकेसोबत संपूर्ण चंद्रपूर शहरात मागील अनेक दिवसांपासून गाजत आहे.
महापालिकेची आमसभा : मालमत्ता कराबाबतचा निर्णय पुन्हा लांबणीवर
चंद्रपूर : मालमत्ता कराचा मुद्दा महापालिकेसोबत संपूर्ण चंद्रपूर शहरात मागील अनेक दिवसांपासून गाजत आहे. नागरिकांची ओरड व विरोधकांच्या आंदोलनानंतर मनपाने यावर फेरविचार करण्यासाठी समिती गठीत केली. समितीच्या अहवालावरून आमसभेत मालमत्ता कराबाबत निर्णय घेतला जाईल, असे वाटत होते. त्यामुळे सर्वच नागरिक या सभेकडे लक्ष देऊन होते. मात्र आज बुधवारी झालेल्या आमसभेत पुन्हा सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी उडाली. विरोधक ओरडत असतानाच सत्ताधाऱ्यांनी याबाबत आयुक्त निर्णय घेतील, असे सांगत आपले हात झटकल्याने चंद्रपूरकरांना मालमत्ता करांबाबत काय होते, याची पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
महापालिकेने मालमत्तेचे खासगी कंपनीकडून सर्वेक्षण केल्यानंतर नवीन कर लागू केले. मागील कराच्या तुलनेत हे कर अव्वाच्या सव्वा असल्याने याला नागरिकांसह विरोधकांनी विरोध केला. त्यामुळे मनपाने यावर निर्णय घेण्यासाठी अभ्यास समिती गठीत केली. या समितीच्या दोन बैठका झाल्या. या बैठकीत समिती सदस्यांनी काही सूचना करीत अहवाल महापौर राखी कंचर्लावार यांच्याकडे सादर केला. या अहवालावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर वाढीव करासंदर्भात निर्णय घेण्याचे ठरले होते. बुधवारच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत हा विषय नमूद केला होता. या विषयाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, नंदू नागरकर, सुनिता लोढीया यांच्यासह १९ नगरसेवकांनी समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी लावून धरली.
मात्र समितीच्या अहवालावर सभागृहात चर्चा करण्याची आवश्यकता नसल्याचे अंजली घोटेकर, रामू तिवारी, अनिल फुलझेले, संदीप आवारी, बंडू हजारे, राहुल पावडे या नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे या विषयावरुन विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांत चांगलीच खडाजंगी झाली. काँग्रेस नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत यासंदर्भातील निर्णय आयुक्त सुधीर शंभरकर यांनी घ्यावा, असे निर्देश महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले. महापौरांच्या या निर्णयामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या सत्ताधारी भाजपच्या हेकेखोरीचा निषेध नोंदविला. वाढीव मालमत्ता करासंदर्भात अजूनपर्यंत निर्णय न झाल्याचे त्यांना परिणाम करवसुलीवर झाला आहे. केवळ १९.५२ टक्के एवढीच वसुली करण्यात कर विभागाला यश आले आहे. काँग्रेस- भाजप नगरसेवकांतील शाब्दीक वादावादीनंतर आयुक्त शंभरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या काळात स्मार्ट सिटीत मनपाचा समावेश होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर आकारणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना सेवेत सवलत नको, सुविधा गरजेच्या असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. आंबेडकरनगरात अनेक समस्या आहेत. मात्र, प्रशासन त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाढीव खांब मंजूर होऊन वर्ष लोटले. मात्र, अजूनही खांब उभारणी झाली नाही. वीटभट्ट्यांच्या खड्ड्यात घनकचरा टाकण्याचे ठरले होते. मात्र अजूनही घनकचरा टाकला जात नाही. स्मशानभूमीजवळ मोठा खड्डा पडला आहे. परंतु, प्रशासन खड्डा बुजवित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवक अनिल रामटेके यांनी सभागृहात सांगितले. नगरसेवक प्रविण पडवेकर यांनी आपल्या प्रभागात पाण्याची समस्या तीव्र झाली असल्याचे सांगत यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. सभेला महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, उपमहापौर वसंता देशमुख, आयुक्त सुधीर शंभरकर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
महिला व बालकल्याण समिती गठित
आजच्या आमसभेत महिला व बालकल्याण समितीचे गठण करण्यात आले. समिती सदस्य म्हणून १२ नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. त्यात भाराकॉ लोकशाही आघाडीच्या अनिता कथडे, एकता गुरले, एस्तेर शिरवार, सुनिता अग्रवाल, सुबेदिया कश्यप, ममता भंडारी, संगीता पेटकुले, भाजपच्या अंजली घोटेकर, सुषमा नागोसे, माया उईके आणि सेनेच्या योगीता मडावी यांची निवड करण्यात आली. समिती गठीत होते. मात्र, काम करण्यास अडथळे येत असल्याची खंत महिला सदस्यांनी बोलून दाखविली.