गोंडपिंपरीचे जुने बसस्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात
By admin | Published: May 23, 2016 12:57 AM2016-05-23T00:57:22+5:302016-05-23T00:57:22+5:30
गोंडपिंपरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात प्रवाशांना विसावा घेण्यासाठी बसस्थानक निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली.
प्रवाशांची गैरसोय : नगरपंचायतीचे दुर्लक्ष
गोंडपिंपरी : गोंडपिंपरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात प्रवाशांना विसावा घेण्यासाठी बसस्थानक निवाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र फळ विक्रेत्यांनी अगदी बसस्थानकासमोरच आपली फळांची दुकाने थाटत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असून बसस्थानकासमोर लावण्यात येणारे फळांचे दुकान त्वरित हटवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोंडपिंपरी शहराच्या राज्य महामार्गावर जुने बसस्थानक आहे. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. जुन्या बसस्थानकासमोर व आजुबाजुला मागील अनेक वर्षांपासून फळ विक्रेत्यांनी आपली फळांची दुकाने थाटून चक्क जुन्या बसस्थानक प्रवासी निवाऱ्याला अतिक्रमणाच्या विळख्यात टाकले आहे. नगरपंचायतीची निर्मिती होण्यापूर्वी ग्रामपंचायतीला वेळोवेळी पत्रव्यवहार करून फळांची दुकाने हटविण्यासाठी विनंती करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने, याकडे दुर्लक्ष केले होते. स्थानिक शहरातून जाणाऱ्या राज्य मार्ग अरुंद असून फळ विक्रेत्यांसह इतरही दुकानदारांनी रस्त्याच्या काठापर्यंत शेड थाटून आपल्या मालाची मांडणी करू लागले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंग करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना विसावा घेण्यासाठी बांधण्यात आलेला प्रवासी निवारा प्रवाशांसाठीच विसावा घेण्यासाठी असावा, अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात जुन्या बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता नगरपंचायत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचेलक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
आठवडी बाजाराची जागा अपुुरी
गोंडपिंपरीचा आठवडी बाजार रविवारी भरतो. आठवडी बाजारासाठी जागा अपूर्ण पडत असल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर दुकाने लावतात. परिणामी वर्दळीचे ठिकाण असलेल्या जुन्या बसस्थानक परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आठवडी बाजारासाठी योग्य जागेची निवड करावी, अशी मागणी होत आहे.