इरई नदीवरील पुलासाठी ६५ कोटींच्या निधीला मान्यता
By admin | Published: March 1, 2017 12:41 AM2017-03-01T00:41:48+5:302017-03-01T00:41:48+5:30
वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नवीन चंद्रपूर शहराचा विकास योजनेअंतर्गत....
पालकमंत्री : नवीन चंद्रपूरच्या विकासाला मिळणार चालना
चंद्रपूर : वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नवीन चंद्रपूर शहराचा विकास योजनेअंतर्गत दाताळा गावानजिक इरई नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ६५ कोटी १९ लक्ष ५० हजार रूपये किंमतीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाने २७ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सन १९९८ मध्ये भाजपा-शिवसेना युती शासनाच्या कार्यकाळात चंद्रपूर शहरालगतच्या १३९.७१ हेक्टर क्षेत्रावर नविन चंद्रपूर शहर वसविण्याचा निर्णय घेण्यात आला. नविन चंद्रपूर येथील अधिसुचित विभागात विकासाची कामे करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. या योजनेच्या विकास आराखडयाला नगरविकास विभागाचे ३० जून १९९८ च्या अधिसूचने अन्वये मान्यता दिली आहे. आतापर्यंत नविन चंद्रपूर येथील भूसंपादन व बाह्य विकासाच्या कामांसाठी शासनाने १८१.२० कोटी इतका निधी खर्च केला आहे. पुलाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने लवकरच पूलाचे काम सुरू होऊन नवीन चंद्रपूरच्या विकासाला चालना मिळेल. (स्थानिक प्रतिनिधी)