अब्दुल कलाम उद्यानात पर्यटकांची विक्रमी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:24 PM2017-12-26T23:24:59+5:302017-12-26T23:25:15+5:30
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील असलेले अब्दुल कलाम उद्यान हे मागील दीड वर्षांपासून लोकांकरिता उघडण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील असलेले अब्दुल कलाम उद्यान हे मागील दीड वर्षांपासून लोकांकरिता उघडण्यात आले. अल्पवधीतच हे उद्यान नागरिकांच्या आकर्षणाचे स्थळ बनले आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक या उद्यानाला भेट देत असून ही गर्दी दिवसागणिक विक्रमाकडे वाटचाल करीत आहेत.
शनिवार, रविवार आणि सोमवार या नाताळच्या सुट्टीच्या तीन दिवसात तब्बल ११ हजार ४६८ पर्यटकांनी अशा या उद्यानाला भेट दिली आहे. हा या उद्यानात पर्यटकांच्या गर्दीचा विक्रमच ठरला आहे.
राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून आणि कल्पनेने या उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम उत्तरोत्तर प्रगतिपथावर आहे. आकर्षक वृक्षवेली, जलसंचय तळे आणि या उद्यानाची विस्तीर्णता यामुळे या उद्यानात विद्यार्थ्यांच्या सहली आणल्या जात आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यासोबतच नजीकच्या आंध्रप्रदेश, गडचिरोली जिल्ह्याच्या भागातून येथे नागरिक येत आहेत. सद्या शाळांना नाताळाच्या सुट्ट्या असल्याने शाळांच्या सहली तसेच इतर अनेकजण या उद्यानाला भेट देवून आनंद घेत आहेत. त्यामुळे बल्लारपूर या मुख्य मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ राहत असते.
याच मार्गावर बॉटनिकल गार्डन प्रस्तावित असून भविष्यात गार्डन मार्ग म्हणून बल्लारपूर रस्त्याला ओळखले जाणे, वावगे ठरणार नाही. अब्दुल आझाद कलाम गार्डनमध्ये प्रवेशासाठी शुल्क असून यातून अनेक कामांसाठी आर्थिक निधी उपलब्ध होत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.