अर्ध्या एकरात शेतकऱ्याने घेतले कारल्याचे विक्रमी उत्पादन; आधुनिक पद्धतीने केली शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 08:24 PM2020-08-12T20:24:46+5:302020-08-12T20:25:38+5:30
राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.
प्रकाश काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतीची अवस्था अधिकच बिकट होत असतानाच राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतकरी किशोर नांदेकर यांनी आपल्या शेतातील अर्ध्या एकरात कारल्याची लागवड केली होती. यात त्यांनी आधुनिक पध्दतीचा अवलंब केला. या शेतीतून त्यांना यंदा विक्रमी उत्पादन मिळत आहे.
राजुरा तालुक्यातील वरोडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर नांदेकर हे आपल्या शेतात दरवर्षी नवनव्या पध्दतीने विविध पिकांची लागवड करीत असतात. शेतकरी किशोर नांदेकर यांची वरोडा-नवेगाव या मुख्य रस्त्यालगत सात एकर शेती आहे. नांदेकर यांचे संयुक्त कुटुंब असल्याने घरातील मंडळी शेतात दिवसरात्र राबत असतात. घरातील प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी समजून शेतीची कामे करतात. त्यांच्या सात एकर शेतीत ते विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात. त्यांनी शेतात कापूस, तूर, सोयाबीन या प्रमुख पिकांसह कारली, हळद, ढेमसे, शेंगा, कोबी, टमाटर, वांगे या पिकांसह भाजीपाला पिके घेतली आहेत.
किशोर नांदेकर यांनी आपल्या अर्ध्या एकर शेतात कारल्याची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी शेतात आधुनिक पद्धतीचा वापर केला. त्यांनी सुरुवातीलाच ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले आहे. अजूनही ते कारल्याचे उत्पादन घेत असून कारले लागल्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना २०० क्विंटल कारल्याचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. यासाठी ते शेतात मोठी मेहनत घेत असतात. राजुरा तालुका कृषी अधिकारी जी.के. कडलग, कृषी पर्यवेक्षक टी.जी.आडे व कृषी सहाय्यक यांचे यासाठी त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. एकीकडे शेतीला अवकळा आली असताना वरोडा येथील शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती नक्कीच हताश झालेल्या शेतकºयांना आशेचा नवा किरण ठरणार आहे.
निसर्गाची अवकृपा, शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र शेतकऱ्यानी हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर नक्कीच शेतीत भरघोस उत्पादन येईल. आजपर्यंत ३५ क्विंटल कारल्याचे उत्पादन घेतले असून पुन्हा २०० क्विंटलपर्यंत कारल्याचे उत्पादन होऊ शकते.
-किशोर नांदेकर
प्रगतशील शेतकरी, वरोडा.