नऊ दिवसांत दीड लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:45 PM2018-07-23T22:45:45+5:302018-07-23T22:46:37+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईने वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर सुरु केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी चंद्रपुरात हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई सुरु केली आहे. मागील नऊ दिवसांत वाहतूक विभागाने २७२ वाहनधारकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईने वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर सुरु केला आहे.
चंद्रपुरात एकाच आठवड्यात घडलेल्या दोन अपघाताच्या घटनेत एक शिक्षिका व एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनेनंतर चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दखल घेत जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढले.त्यानुसार वाहतूक विभागाने शहरातील विविध चौकामध्ये तसेच मुख्य मार्गावर वाहतूक शिपायांची नियुक्ती करुन विना हेल्मेटने गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे सुरु केले असून प्रत्येक वाहनचालकांंना पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
त्यानुसार मागील पाच दिवसात वाहतूक विभागाने २७२ वाहनचालकांवर कारवाई करीत एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात वाहतूक निरिक्षक विलास चव्हाण व त्यांच्या चमूने केली.
हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांचा सत्कार
हेल्मेट वापरासंबंधी जनजागृती करण्याच्या दृष्टीने वाहतूक विभागाने हेल्मेट घालून प्रवास करणाºया वाहनधारकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आपल्या आप्तेष्ठांना हेल्मेट घालण्याबाबात प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.
सक्ती नकोय, रस्त्याची दुरुस्ती करा
शहरातील रस्त्यावरील खड्ड्याने एका शिक्षिकेचा व एका १७ वर्षीय मुलीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे महानगरातील रस्त्याचा व वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्ती लागू केली. त्यानुसार विना हेल्मेट वाहनचालविणाºयांवर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातात जीव जात असताना त्यावर आळा घालण्यासाठी हेल्मेट सक्ती हा पर्याय नसून रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सुरु शहरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कारवाईपोटी ‘टप्पर’ हेल्मेटचा वापर
जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी १४ जुलैला हेल्मटसक्ती लागू केली. त्यानुसार वाहतूक विभागाने विना हेल्मेटने गाडी चालवणाऱ्यांना वाहनधारकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी फुटपाथवर विक्रीसाठी ठेवलेले शंभर ते दोनशे रुपये किंमतीचे टप्पर हेल्मेटचा वापर करताना दिसून येत आहेत.
अपघात वेळी-अवेळी होऊ शकतात. त्यामुळे नेहमी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे, शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत. ही घटना टाळण्यासाठी वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा.
- विलास चव्हाण,
वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर