सिंदेवाही तालुक्यात पशुधनात होत आहे घट
By admin | Published: January 17, 2015 10:56 PM2015-01-17T22:56:16+5:302015-01-17T22:56:16+5:30
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे.
सिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. यासाठी जनावरांच्या चारा पाण्याची भेडसावणारी समस्या कारणीभूत ठरत आहे.
शेतकरी व शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहेत. देशातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलाचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा सखा म्हणून बैलांची ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत, तर दुसरीकडे शेतमजुरांच्या मजुरीत पाच पटीने वाढ झाली आहे. परिणामी शेती करणे धान उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. बैलाची, गाय व म्हैस यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलाचा गोठा असे. त्या गोठ्यात बैल दिसणे हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बैलाचे गोठे दिसेनासे झाले आहेत. पूर्वी जंगलात जनावरांसाठी कुरण राखून ठेवायचे, आता कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळणारे दुध, दही, लोणी, तूप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते. त्यावेळी ग्रामीण भागात दुधाची धवलक्रांती होती. लग्न कार्यप्रसंगी लागणारे दुध, दही गावातच मिळत होते. सोबत शेणखत तयार होत होते. शेतातील पिकाचे उत्पादनात वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे.
उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चारा पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी व शेतमजुरांनी गेल्या दहा वर्षात पाळीव जनावरे विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ जनावरे सुद्धा दुसऱ्यालाच विकावी लागतात.
काही जनावरे कत्तलखान्यात विकतात. त्यामुळे ग्रामीण भागात व शहरात गाय व म्हशीचे दूध मिळत नाही. त्यामुळे आता प्लॉस्टिकमधील दूध विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)