विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:36+5:302021-07-03T04:18:36+5:30
तळोधी बा : गोंडवाना विद्यापीठाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात कपात आणि सर्व विद्यार्थ्यांचे सत्र २०२१-२२ ...
तळोधी बा : गोंडवाना विद्यापीठाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात कपात आणि सर्व विद्यार्थ्यांचे सत्र २०२१-२२ च्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उन्हाळी २०२१ च्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय अतिरिक्त शुल्क आणि परीक्षा शुल्क घेत होते. याच्याविरोधात अभाविप गडचिरोली शाखेने १ मार्चला विद्यापीठाला निवेदन दिले. तसेच अभाविपतर्फे झालेल्या ऑनलाईन आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा केल्यामुळे विद्यापीठाने २९ जूनला शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क २०२०-२१ चे इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क यामध्ये १०० टक्के कपात केली आहे आणि ग्रंथालय शुल्क, पर्यावरण शुल्क, प्रयोगशाळा शुल्कात ५० टक्के कपात केली. तसेच उन्हाळी २०-२१ च्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांनी कपात करण्यात आली. या निर्णयामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.