रात्रीचे अपघात टाळण्यासाठी अनेक सायकलींना लावले रिफ्लेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:37+5:30
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सायकल चालकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बंगाली कॅम्प व श्री टॉकीज चौक येथे या मोहिमेचा शभारंभ सकाळी ८ वाजता करण्यात आला. स्थानिक बंगाली कॅम्प चौकात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : परिवहन विभागाशी संबंधित कार्यालये व इतरांकडून रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान वाहनचालकांना वाहतूक शिस्त आणि नियमांबाबत मार्गदर्शन केले जाते. मात्र चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने एक पाऊल पुढे टाकत शेकडोच्या संख्येने असलेल्या कामगार व इतर सायकल स्वारांसाठी चंद्रपुरात रिफ्लेक्टर मोहीम राबविली. महाराष्ट्रातील कदाचित पहिलाच उपक्रम या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सायकल चालकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बंगाली कॅम्प व श्री टॉकीज चौक येथे या मोहिमेचा शभारंभ सकाळी ८ वाजता करण्यात आला. स्थानिक बंगाली कॅम्प चौकात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी शेकडो सायकलींना रिफ्लेक्टर लावून रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे रात्रीच्या अंधारात रेडियमवर प्रकाश पडल्यानंतर सायकल दिसून येते. त्यामुळे सायकल चालकांसाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मदत होणार आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी सीबीएसएसच्या उपक्रमाचे कौतुक करीत केंद्रीय स्तरावर पोहचविणार असल्याची ग्वाही दिली. सायकल चालकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. फासे यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या या उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा उपक्रम सुरू होणार असल्याचेही पाहुण्यांनी यावेळी सांगितले. मोहिमेची जबाबदारी सुबोध कासुलकर, वनश्री मेश्राम यांनी जबाबदारी पार पाडली. यशस्वीतेसाठी विजय चंदावार, डॉ. भास्करवार, डॉ. दास, मधुसूदन रूंगठा, अश्विनी खोब्रागडे, दिनेश जुमडे, शिशिर हलदार, सागर येळणे, आशिष रॉय, स्वप्नील राजुरकर, कपिश उसगावकर, डॉ. पालीवाल, कावळे, महेंद्र राळे, रायपुरे, गुंडावार, उपगन्लावार, जुगल सोमानी, अमोल राऊत, राहुल ताकवट आदींनी सहकार्य केले.